Afghanistan vs Pakistan War : अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या अफगाणिस्तान व भारतावरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आरोप केला होता की अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये अलीकडे झालेल्या संघर्षामागे भारताचा हात होता. यावर याकूब म्हणाले, “पाकिस्तानचे हे आरोप पूर्णपणे निराधार व तर्कहीन आहेत. हे असले आरोप कधीच स्वीकारता येणार नाहीत. आम्ही या आरोपांचं खंडण करतो.”

मुजाहिद यांनी नुकतीच अल-जजीरा या वृत्तपत्राशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “त्यांचे सगळे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. कोणीही आमच्या भूमीचा गैरवापर करू नये असं आमचं धोरण आहे. कोणीही कुठल्याही देशाविरोधात आमच्या भूमीचा वापर करणं आम्हाला सहन होणार नाही. स्वतंत्र देश म्हणून आमचे भारताशी संबंध आहेत आणि आमच्या राष्ट्रीय हितांअंतर्गत आम्ही आमचे भारताबरोबरचे संबंध आणखी दृढ करू.”

पाकिस्तानविरोधातील युद्ध जिंकल्याचा काबूलमध्ये जल्लोष

अलीकडेच पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये काही दिवस सशस्त्र संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये अनेक दिवस हिंसक चकमकी झाल्या. या संघर्षात अनेक जण मारले गेले. मात्र, आता दोन्ही बाजूने युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या लष्करांनी संघर्ष थांबवला आहे. मात्र, पाकिस्ताने या संघर्षाचं खापर भारतावर फोडलं आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीने देशभर युद्ध जिंकल्याचा जल्लोष केला.

अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधांवर याकूब काय म्हणाले?

मुजाहिद यांनी अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील संबंधांवर भाष्य केलं. ते म्हणाले की “आम्ही आमचा शेजारधर्म सोडलेला नाही. काबूलला इस्लामाबादशी शेजारी म्हणून चांगले संबंध निर्माण करायचे आहेत.”

आम्हाला पाकिस्तानबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत : मुजाहिद याकूब

मुजाहिद म्हणाले, “अफगाणिस्तान व पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. आमच्यामधील तणाव हा कोणासाठीच योग्य नाही. आमचे संबंध हे एकमेकांचा सन्मान, आपसातील आदर व शेजारधर्माच्या सिद्धांतांवर आधारित असायला हवेत. परंतु, अफगाणिस्तानवर हल्ला झाला तर प्रत्येक अफगानी त्याच्या जमिनीच्या संरक्षणासाठी रणांगणात उतरेल.”

दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप फेटाळला

पाकिस्तान सातत्याने आरोप करत आहे की तालिबान सरकार त्यांच्या देशात दहशतवादी संघटनांना शरण देत आहे. परंतु, मुजाहिद यांनी पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळले आहेत.