Afganistan Warns Pakistan From India: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी भारताला आश्वासन दिले की, अफगाणिस्तानच्या भूमीतून कोणालाही कोणत्याही देशाविरुद्ध कारवाया करू देणार नाही. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेले अमीर खान मुत्ताकी यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला इशारा दिला की, “पाकिस्तानने अफगाणी लोकांच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये”.

पाकिस्तानने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या छावण्यांवर हल्ले सुरू केल्यामुळे अफगाणिस्तानने हा कठोर इशारा दिला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तानला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा सतत वापर होत असल्याने त्यांचा संयम सुटला आहे.

“पाकिस्तानचे हे कृत्य चुकीचे आहे. अफगाणिस्तानात ४० वर्षांनंतर शांतता आणि प्रगती सुरू झाली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. जर कोणाला असे करायचे असेल तर त्यांनी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि नाटोला विचारावे, जेणेकरून ते अफगाणिस्तानशी खेळ करणे चांगले नाही हे योग्य प्रकारे सांगू शकतील”, असे तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी म्हणाले.

गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवायांमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या तणावपूर्ण संबंधांमुळे भारताला तालिबानशी संबंध वाढवण्याची संधी मिळाली आहे.

शुक्रवारी मुत्ताकी यांनी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारताने काबूलमधील आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुत्ताकी यांनी प्रादेशिक स्थिरतेसाठी आश्वासन देताना म्हटले की, “आम्ही सुरक्षा सहकार्यावर सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही कोणालाही कोणत्याही देशाविरुद्ध अफगाणिस्तानची भूमी वापरू देणार नाही.”

याचबरोबर त्यांनी भारताच्या विकास प्रकल्प सुरू ठेवण्याच्या आणि त्यांचा विस्तार करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि द्विपक्षीय व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी संयुक्त व्यापार समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानातील कारवायांबद्दल पाकिस्तानला कठोर इशाराही दिला. “आम्ही पाकिस्तान सरकारला इशारा देऊ इच्छितो की, या दृष्टिकोनातून समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. अफगाणिस्तानातील लोकांच्या संयमाला आणि धैर्याला आव्हान देऊ नये,” असे ते म्हणाले.