चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अखेर १५ वर्षानंतर नवीन असॉल्ट रायफल्स मिळाल्या आहेत. अमेरिकन बनावटीच्या या नवीन रायफल्स दीर्घ पल्ल्याच्या असून सीमा रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीच खास या असॉल्ट रायफल्सची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन कंपनी सिग साउरसोबत भारत सरकारने ६३८ कोटी रुपयांचा रायफल्स खरेदीचा करार केला.

त्यातील ७२,४०० पैकी पहिल्या १० हजार रायफल्स लष्कराला मिळाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ५०० मीटरपर्यंत रेंज असलेल्या या सर्व असॉल्ट रायफल्स २०२० पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. करारानुसार, भारताला एकूण ७२,४०० SiG-716 असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत. त्यापैकी सैन्याला ६६,४०० इंडियन एअर फोर्सला चार हजार तर, नौदलाला दोन हजार रायफल्स मिळणार आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या रायफल्स अत्याधुनिक असून त्यांची देखभाल करणेही सोपे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानी सैनिकांचा कर्दनकाळ ठरणार हे नवे अस्त्र
नव्या असॉल्ट रायफल्समुळे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याची ताकत कैकपटीने वाढणार आहे. या रायफल्सची दूरपर्यंत मारक क्षमता असल्यामुळे घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना, पाकिस्तानी सैनिकांना टिपणे अधिक सोपे होणार आहे. सीमेवर भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये सातत्याने चकमकी सुरु असतात. या नव्या अस्त्रामुळे भारतीय सैन्याचे बळ निश्चितच वाढणार आहे. १५ वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने या रायफल्सची केलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

भारत-अमेरिका दृढ मैत्रीमुळे शक्य
अमेरिका आणि भारतामधील दृढ मैत्रीसंबंध आणि नव्या संरक्षण सहकार्य करारामुळे भारताला आता अमेरिकेकडून नवीन अत्याधुनिक शस्त्रास्त्र मिळत आहेत. नव्वदच्या दशकात भारताला अशा आधुनिक शस्त्रांसाठी रशियावर अवलंबून रहावे लागत होते.