Afghanistan Pakistan Water Dispute: अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या माहितीनुसार, तालिबानशासित अफगाणिस्तान आता पाकिस्तानला जाणारे पाणी अडविण्यासाठी त्यांच्या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखत आहे. कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी दिले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात काही दिवसांपासून सशस्त्र संघर्ष पेटलेला असताना आणि शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर आता अफगाणिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताने मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाचा पुनरावृत्ती अफगाणिस्तानने केल्याचे यातून दिसून येत आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तीन नद्यांमधून पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी थांबवले. पाकिस्तानात पाणी सोडण्यासंबंधी असलेल्या सिंधू जल कराराला भारताने स्थगिती दिली.

अफगाणिस्तानचे पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरणे बांधण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी देशाअंतर्गत कंपन्यांशी करार करा, असेही ते म्हटले आहेत. याबाबतची माहिती मंत्रालयाचे उपममंत्री मुहाजेर फराही यांनी गुरूवारी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात लंडनस्थित असलेल्या अफगाणि पत्रकार सामी युसुफझाई यांची प्रतिक्रिया दिली आहे. भारतानंतर आता पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याची वेळ अफगाणिस्तानवर आलेली दिसते. युसुफझाई यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च नेत्यांनी अफगाणी कंपन्यांशी करार करण्याचे निर्देश दिले आहेत.

४८० किमी लांबीची कुनार नदी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये आणि पाकिस्तान सीमेजवळील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ही नदी कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर ती पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामध्ये प्रवेश करते. जिथे ती जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला जाऊन मिळते. कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्राल नदी म्हणतात.

अफगाण पत्रकार सामी युसुफझाई यांनी म्हटले की, पाकिस्तानात वाहणाऱ्या काबूल आणि कुनार नद्या बऱ्याच काळापासून पाकिस्तानमध्ये पाण्याचा मोठा स्त्रोत म्हणून पाहिल्या जातात.