दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी रात्री पक्षाचे नेते कुमार विश्वास यांची भेट घेतली. यानंतर पक्षात सारे काही आलबेल असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. कुमार विश्वास यांची भेट घेण्यासाठी केजरीवाल गाझियाबादला गेले होते. कुमार विश्वास काही दिवसांपासून पक्षाविषयी उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांची भेट घेतली.

‘कुमार विश्वास चळवळीचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांच्या मनात पक्षातील काही मुद्यांबद्दल नाराजी आहे. मात्र आम्ही त्यांची समजूत काढू,’ असे केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांची भेट घेतल्यानंतर म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयादेखील उपस्थित होते. काल (मंगळवारी) संध्याकाळी अश्रूपूर्ण डोळ्यांनी ‘आज रात्री निर्णय घेऊ’, असे म्हटले होते. त्यामुळे कुमार विश्वास आम आदमी पक्ष सोडणार, अशी चर्चा सुरु झाली होती. विश्वास आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे आधीच विविध निवडणुकांमध्ये पराभवांचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षाला विश्वास यांची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळेच केजरीवाल यांनी विश्वास यांची भेट घेतली.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात दुफळी माजली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्वास हे संघ आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुमार विश्वास यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना कुमार विश्वास भावूकही झाले होते. ‘अमानतुल्ला यांनी माझ्यावर आरोप केले. पण असे आरोप त्यांनी केजरीवाल किंवा सिसोदिया यांच्यावर केले असते तर आत्तापर्यंत त्यांना पक्षातून बाहेर काढले असते’, असे कुमार विश्वास यांनी म्हटले होते. ‘माझ्याविरोधात कट रचण्यात आला असून मी मुख्यमंत्री होण्यासाठी आलो नाही. मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. पक्षातील चुकांवर मी गप्प बसणार नाही’, असे त्यांनी पक्षनेतृत्वाला सुनावले होते.

‘अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया आणि कुमार विश्वास या तीन व्यक्तींनी आम आदमी पक्षाची स्थापना करत एका चळवळीची सुरुवात केली. मात्र अमानतुल्ला खान यांच्या आरोपांमुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले,’ असे विश्वास यांनी म्हटले.