Bilawal Bhutto statement on Pakistan Terror Backing: पाकिस्तानकडून दहशतवाद पुरस्कृत केला जाते, असा आरोप भारतासह अनेक देशांनी आजवर केलेला आहे. पाकिस्तानने मात्र कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानने अमेरिका आणि पाश्चात्या देशांच्या सांगण्यावरून दहशतवादाला खतपाणी घातल्याचे मान्य केले होते. आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनीही ही बाब मान्य केली असून इतिहासात आम्ही हे घाणेरडे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
बिलावल भुट्टो यांनीही स्काय न्यूजला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमोरही ख्वाजा आसिफ यांना विचारलेला प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, हे काही आता गुपित राहिलेले नाही. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरविली होती.
भुट्टो पुढे म्हणाले, “पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला पाठिंबा देऊन त्यांना निधी पुरवठा केला होता. पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता. पाश्चात्या देशांसह एकत्र येऊन आणि त्यांच्या साथीने आम्ही हे काम केले. पाकिस्तानात दहशतवादाच्या अनेक लाटा येत राहिल्या. यात आमचेही नुकसान झाले.”
आता परिस्थिती बदलली
पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादाला पोसले असले तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे, असा दावाही भुट्टो यांनी केला. “आज आम्ही दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यात सामील नाहीत. इतिहासात नक्कीच दुर्दैवाने आम्ही याचा भाग होतो. पण यातून आम्ही काही धडेही शिकलो”, असे भुट्टो यांनी या मुलाखतीत सांगितले.

बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबालाही दहशतवादाचा फटका बसला असल्याचे ते म्हणाले. बिलावल यांची आई बेनझीर भुट्टो यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. “बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर परिस्थिती बदलली. आम्ही अंतर्गत सुधारणा केल्या. लष्करात बदल केले. कट्टरतावादी गटांवर कारवाईचा बडगा उगारला. याआधी पाकिस्तानात रोज अतिरेकी हल्ले झालेले ऐकायला मिळत असे. याची गंभीर दखल घेत आम्ही परिस्थिती बदलली आहे”, असेही बिलावल भुट्टो म्हणाले.