पीटीआय, नवी दिल्ली : अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचे गुरुवारी उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांत तीव्र पडसाद उमटले.  तरुणांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ करत या योजनेचा निषेध केला़  दरम्यान, तरुणांच्या असंतोषामुळे केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत या योजनेंतर्गत वयोमर्यादा २३ वर नेली.

‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती़  त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला़ त्याचे लोण गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत पोहोचल़े  बिहारमधील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये तरुणांनी रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर जाळपोळ केली़  भाजपच्या एका आमदाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली़  आंदोलकांनी आरा रेल्वे स्थानकावर एका रेल्वेइंजिनाला आग लावली़  छाप्रा, भबुआ रेल्वे स्थानकांतही आंदोलकांनी मोडतोड केली़  आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या़

उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्य़ांत तरुणांनी दगडफेक, घोषणाबाजी करत या योजनेचा निषेध केला़  अलिगड आणि आग्रा येथे आंदोलकांनी दगडफेक केली़  निदर्शनांमुळे अलिगडमध्ये दोन तास वाहतूक विस्कळीत झाली़  आग्रा येथे सरकारी बसवर दगडफेक करण्यात आली़  आंदोलकांनी आग्रा-जयपूर महामार्गही रोखून धरला़  बुलंदशहर, मथुरा, फिरोजाबाद आणि बलिया या जिल्ह्यांतही तरुण रस्त्यावर उतरल़े

हरियाणाच्या पालवलमध्ये शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून वाहनांची जाळपोळ केली़  आंदोलकांनी रस्ते रोखून धरत दगडफेकही केली़  गुरुग्राम, रेवारी, छार्की, हिसार, रोहतक या जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाल़े  पालवलमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला़  या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाल़े  हिंसाचारामुळे पालवलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली़

राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या नेतृत्वाखाली तरुणांनी निदर्शने केली़  जयपूर, जोधपूर, अजमेरमध्ये हिंसक आंदोलन झाल़े  या जिल्ह्यांत जादा पोलीस कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल़े  मध्य प्रदेशात ग्वाल्हेर आणि इंदोर येथे आंदोलन झाल़े

दिल्लीतही आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखून धरल़े  जम्मूमध्ये बी़ सी़ मार्गावरील लष्करी कार्यालयाबाहेर तरुणांनी निदर्शने केली़  तसेच त्यांनी काही ठिकाणी रस्ते रोखून धरल़े  पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला.

भाजपची कोंडी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ‘अग्निपथ’ योजनेचे कौतुक करून प्रचार करत असताना बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीतील संयुक्त जनता दलाने वेगळी भूमिका घेतली़ ‘‘हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही़  पण, या आंदोलकांचे म्हणणे ऐकायला हवे’’, असे पक्षाने म्हटले आह़े  या योजनेवर थेट टीका न करता आंदोलकांची बाजू ऐकण्याची गरज व्यक्त करत संयुक्त जनता दलाने भाजपची कोंडी केली़

वयोमर्यादेत बदल..

‘अग्निपथ’ योजनेवरून तरुणांचा रोष आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतल़े  या योजनेंतर्गत सैन्यभरतीसाठी वयोमर्यादा २१ वरून २३ करण्याचा

निर्णय केंद्राने घेतला़  या योजनेमुळे संरक्षण दलाला नवे सामर्थ्य मिळेल, असा दावा करत सरकारने योजनेचे फायदे अधोरेखित केल़े चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरां’ना ११. ७१ लाखांचा सेवानिधी, बँक कर्ज योजनेचा लाभ, बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्र मिळणार आहे, याकडे केंद्राने लक्ष वेधल़े केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलांत ‘अग्निवीरां’ना प्राधान्य देण्यात येईल, असेही केंद्राने स्पष्ट केले.

आक्षेप काय? चार वर्षांच्या सेवेनंतर रोजगाराचे काय, असा प्रश्न आंदोलकांना पडला आह़े  त्यामुळे या योजनेत नोकरीची सुरक्षितता नसणे आणि पेन्शन लाभ न मिळणे हे आंदोलकांच्या दृष्टीने आक्षेपाचे मुद्दे आहेत़  दोन वर्षे करोनामुळे लष्करभरती होऊ शकली नाही़  त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष आहे. आता ही योजनाच रद्द करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

३४ रेल्वेगाडय़ा रद्द

उत्तर भारतात तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे ३४ रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या़  तसेच आठ गाडय़ा अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आल़े  आंदोलनामुळे ७२ रेल्वेगाडय़ांना विलंब झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांचे टीकास्त्र

  • ‘अग्निपथ’ योजनेवर काँग्रेससह विरोधकांनी जोरदार टीका केली़ तरुणांना ‘अग्निपथा’वर चालायला लावून त्यांच्या संयमाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केले. 
  • तरुणांचा स्वप्नभंग करू नका, असे सांगत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सरकारला लक्ष्य केले. 
  • माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बसप आदी पक्षांनीही केंद्रावर टीका केली़ ‘अग्निपथ’ योजनेविरोधात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत शनिवारी आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रीय लोकदलाने केली आहे.