Ahmedabad Air India Plane Crash Sabotage Angle : अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघाताचं मुख्य कारण अद्याप समोर आलं नसून त्याचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. या तपासासाठी केंद्र सरकारने नेमलेलं पथक विमानाचं काही नुकसान (तोडफोड) करण्यात आलं होतं का या बाजूने देखील तपास करणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाबत माहिती दिली आहे. मोहळ म्हणाले, “विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) अपघाताचा तोडफोडीच्या संशयातूनही तपास करत आहे.”

मुरलीधर मोहोळ यांनी एनडीटीव्हीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “या अपघाताचा सर्व बाजूने तपास केला जात आहे, यामध्ये विमानाच्या नुकसानाच्या बाजूनेही तपास केला जाईल. तपास पथक डोळ्यात तेल घालून सीसीटीव्ही फूटेज तपासत आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानाचे दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडले होते. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडण्याची ही फार दुर्मिळ घटना आहे. अशा घटना सहसा घडत नाहीत.”

विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला

केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्हाला तपासात विमानाचा ब्लॉक बॉक्स सापडला आहे. यामध्ये Cockpit Voice Recorder (CVR) आणि Flight Data Recorder (FDR) चा समावेश आहे. ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानची सर्व प्रकारची माहिती साठवून ठेवतो. यामुळे विमान अपघाताची कारणं समजून घेण्यास मदत होते.”

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “या घटनेचा तपास अहवाल समोर आल्यानंतर अपघातामागचं मुख्य कारण समजेल. इंजिनात बिघाड झाला होता की इंधन पुरवठ्यात समस्या होती की आणखी काही, याबद्दल आत्ताच काही बोलणं घाईचं ठरेल. परंतु, तपासात सर्व काही बाहेर येईल. या घटनेचा तपास अहवाल येत्या तीन महिन्यांत आपल्या समोर येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार?

दरम्यान, या विमानाच्या अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी विमानातील ब्लॅक बॉक्स संशोधनासाठी परदेशात पाठवला जाईल, अशा बातम्या काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, या बातम्या मोहोळ यांनी फेटाळल्या आहेत. ते म्हणाले, “विमानातील ब्लॅक बॉक्स एएआयबीच्या ताब्यात आहे. त्यांचं पथक ब्लॅक बॉक्समधील माहितीचं विश्लेषण करेल. ब्लॅक बॉक्स कुठेही पाठवला जाणार नाही.”