अहमदाबादमधील एका खासगी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारपासून (२ ऑगस्ट) शहरातील १,८०० खासगी शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
अहमदाबाद शहर जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) रोहित चौधरी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “ही घटना सर्वांना धक्का देणारी आणि डोळ्यात अंजन घालणारी होती. येत्या शनिवारपासून सारथी या प्रकल्पांतर्गत १,८०० शाळांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला आम्ही प्रत्येक शाळेत दोन शिक्षकांना ऑनलाइन सत्राद्वारे मार्गदर्शन म्हणून प्रशिक्षण देऊ, जे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबद्दल अधिक माहिती देतील.” गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये ‘प्रोजेक्ट सारथी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती, ज्यात सध्या सुमारे २०० शाळांचा सक्रिय सहभाग आहे.
नवरंगपुरा येथील सोम ललित शाळेत शिक्षण घेणाऱ्या बारावीतील विद्यार्थिनीने याच आठवड्यात शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती विद्यार्थिनी नैराश्याने त्रस्त होती आणि एक महिनाभरापासून रजेवर होती.
२ ऑगस्टपासून सत्रांची सुरुवात
या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणाले, १,८०० शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून २ ऑगस्टपासून ऑनलाइन सत्रांची सुरुवात होणार आहे. या सत्रांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचा सहभाग असणार आहे. दर आठवड्याला एकदा होणाऱ्या ऑनलाइन मार्गदर्शन सत्रांमधून मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ व योगतज्ज्ञ यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी उपाय सुचवले जातील.
या सत्रांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही अडचणी मोकळेपणाने मांडण्यास प्रोत्साहन दिले जाईल आणि सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्रीही दिली जाईल.
दबलेल्या भावना, ताणतणाव, ड्रग्ज व अल्कोहोलसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण, तसेच मित्रमंडळीतील मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणारा समवयस्क दबाव अशा गंभीर मुद्द्यांकडेही अधिकारी विशेष लक्ष केंद्रित करीत आहेत.
‘विश्वास बॉक्स’द्वारे मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी
या उपक्रमांतर्गत शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख सहजपणे करू शकतील आणि आपल्या जबाबदाऱ्या अधिक जागरूकतेने पार पाडू शकतील. शहरातील सर्व १,८०० शाळांमध्ये दर महिन्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण सत्र आयोजित करणे हे जिल्हा शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये पालक आणि स्थानिक समुदाय नेत्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
सध्या या कार्यक्रमांतर्गत सुमारे ५०० मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्याशिवाय काही शाळांमध्ये एक विशेष ‘बॉक्स’ ठेवण्यात येणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या मानसिक किंवा इतर समस्या गोपनीय पद्धतीने शाळेच्या मानसिक आरोग्याच्या डॉक्टरांना सांगू शकतात.