नामदेव कुंभार, औरंगाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादमध्ये एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित आघाडीने ताकदपणाला लावली आहे. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये तळ ठोकला आहे. औरंगाबादमधील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये ओवैसी दारोदारी जाऊन प्रचार करत आहे. शहरातील नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन देत इम्तियाज जलील यांना मत देण्याचे आवाहन करीत आहेत.

औरंगाबाद शहरातील मुस्लिम तरूणांमध्ये असदुद्दीन ओवैसी आणि एमआयएम विषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. त्याचा प्रत्यय ओवैसींना गराडा घालणाऱ्या गर्दीतून दिसत असल्याचे चित्र आहे. जलील यांच्यासाठी ओवैसी यांनी डोअर टू डोअर प्रचाराचा मार्ग अवलंबला असला तरी काँग्रेसचा मतदान असलेला मुस्लिम वर्ग एमआयएमला साथ देणार का? हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. इम्तियाज जलील औरंगाबादमध्येच विधानसभेचे आमदार आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळात त्यांनी मतदारांचे लक्ष वेधेल अशी कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. ही त्यांची कुमकुवत बाजू आहे. मात्र, पत्रकार आणि उच्चशिक्षित चेहरा आहेत, तसेच शहरांतील समस्यांची त्यांना जाण आहे.

काँग्रसने आमदार सुभाष झांबड यांना, तर एमआयएमने जलील यांना तिकिट दिल्याने शिवसनेचे विद्यामान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयातील अडचणी बऱ्याच कमी झाल्या होत्या. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून रणांगणात उडी घेतली. त्यामुळे चारही उमेदारांमुळे होणाऱ्या मतविभाजनांने निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागू शकतात.

जलील यांच्या प्रचारासाठी ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांची शुक्रवारी जाहीर सभा होत आहे. या सभेत ओवैसी आणि आंबेडकर नेमक काय बोलतात? त्यावरूनही निवडणुकीची दिशा बदलू शकते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनामुळे हर्षवर्धन जाधव यांची वाढत चाललेली लोकप्रियता खैरेंसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

वंचित आघाडीमुळे जलील यांना दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मते मिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळेच ओवैसी यांनी तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये तळ ठोकला आहे. याचा जलील यांना कितपत फायदा होतोय ते २३ तारखेला स्पष्ट होईल. पण सध्या तरी मतांची विभागणी आणि जातीय ध्रुविकरण यावर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा निकाल अवलंबून असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८४ हजार ८६५ मतदार आहेत. महापालिकेत ११५ पैकी एमआयएमचे २४ नगरसेवक आहेत. शहरात मुस्लिम मतदारांची संख्या ३५ टक्क्यांपर्यंत, तर दलित मतदारांची संख्या १५ टक्क्यांच्या पुढे आहे. तसेच ओबीसींची मते ३० टक्के आहेत. सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील चौरंगी लढत विकासाच्या मुद्द्यांपासून फारकत घेत जात-धर्माच्या मुद्द्याकंडे वळल्याचे चित्र आहे. सत्तेत हक्काचा वाटा पाहिजे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीने दलित-मुस्लिम मतदारांना साकडे घातले आहे. ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर याच्या हातमिळवणीमुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघात रंगत आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim asaduddin owaisi impact in aurangabad will create problem for shiv sena
First published on: 19-04-2019 at 17:27 IST