पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून (२२ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर आरोप केले आहेत. “मोदी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यांचं दक्षिण अफ्रिकेच्या एका साध्या मंत्र्याने स्वागत केलं,” असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. तसेच स्वागतासाठी दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष न आल्याने मोदी रागावले, असा आरोप ओवैसी यांनी केला. त्यांनी एक ट्वीट रिट्विट करत हे आरोप केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खूप मोठी आहे, असं खोटं सांगून देशाच्या भोळ्या लोकांना फसवलं जात आहे. दक्षिण अफ्रिकेतून बातमी आली आहे की, पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेचे कुणीतरी साधे मंत्री आले होते. त्यांचे राष्ट्रपती चीनच्या अध्यक्षांबरोबर व्यग्र होते.”

“मोदींनी दक्षिण अफ्रिकेत पोहचल्यावर विमानातून उतरण्यास नकार दिला”

“दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती आपल्या स्वागताला आले नाही, ते चीनच्या अध्यक्षांबरोबर व्यग्र असल्याचं ऐकून पंतप्रधान मोदींना राग आला आणि त्यांनी विमानातून उतरण्यास नकार दिला. जर हे खरं असेल, तर पंतप्रधान मोदींना असं बालिश वागणं शोभतं का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे”, असा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

मोदींचं विमानतळावर दक्षिण अफ्रिकेच्या उपाध्यक्षांकडून स्वागत

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवारपासून (२२ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत; आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होणार

यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भारतीयवंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता.