नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हवाई दलासाठी ९७ ‘तेजस एमके-१ए’ या हलक्या लढाऊ विमानांच्या (एलसीए) खरेदीसाठी ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’बरोबर (एचएएल) ६२,३७० कोटी रुपयांचा करार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने गेल्या महिन्यात या खरेदीला मंजुरी दिली होती. ही विमाने २०२७-२८ पासून हवाई दलाला देण्यास सुरुवात होईल. पुढील सहा वर्षे ही विमाने हवाई दलामध्ये दाखल होत राहतील.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, ‘करारामध्ये ६८ लढाऊ विमाने आणि २९ दोन सीट असलेल्या विमानांचा आणि हवाई दलासाठी आवश्यक इतर साधनांच्या खरेदीचाही समावेश आहे. या खरेदीसाठी करांव्यतिरिक्त ६२,३७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येईल.’
‘यापूर्वी ‘एचएएल’बरोबर २०२१ मध्ये संरक्षण मंत्रालयाने ८३ तेजस ‘एमके-१ए’ विमाने खरेदी करण्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. विमानामध्ये ६४ टक्क्यांहून अधिक देशी बनावटीची साधने वापरली आहेत. तसेच २०२१च्या कराराच्या तुलनेत अतिरिक्त ६७ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ‘उत्तम ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईएसए) रडार’, ‘स्वयम् रक्षा कवच’ ही देशी बनावटीची अत्याधुनिक साधनेही या विमानामध्ये असतील.’
मिग-२१ विमानांची जागा घेणार
एक इंजिन असलेली तेजस ‘एमके-१ए’ ही विमाने हवाई दलातून निवृत्त होत असलेल्या ‘मिग-२१’ विमानांची जागा घेतील. मिग-२१ विमाने निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी हा करार करण्यात आला आहे.
रोजगारनिर्मितीला चालना
– या विमानाच्या विविध उपकरणनिर्मितीत देशभरातील १०५ कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.
– या विमानांच्या उत्पादनामुळे ११,७५० प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार दर वर्षी (सहा वर्षांपर्यंत) तयार होणार आहेत.
लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन ३१ वर
तेजस ही हलकी लढाऊ विमाने हवाई दलात दाखल झाल्यानंतर लढाऊ विमानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वाड्रन मंजूर आहेत. पण, प्रत्यक्षात ३१ स्क्वाड्रन आहेत. ‘मिग २१’ विमाने निवृत्त झाल्यानंतर ही कमतरता अधिकच भासणार आहे. तेजस विमानेही प्रत्यक्षात हवाई दलात दाखल होण्यास काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.