मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित विमान मस्कतहून कोचीला येण्यासाठी तयारी करत होतं. दरम्यान, विमानाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं आढळून आलं. यानंतर तातडीने उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे.

या विमानात १४१ प्रवाशांसह सहा क्रू मेंबर्स होते. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने सर्वांना विमानातून उतरवण्यात आलं आहे. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. एअर इंडियाचं ‘फ्लाइट IX 442’ हे विमान मस्कत विमानतळावर धावपट्टीवर उभा होतं. यावेळी अचानक विमानाच्या इंजिनमधून धूर निघू लागला. यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याचीही माहिती मिळाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विमान प्रशासनाने तातडीने उड्डाण रद्द केलं आहे.

हेही वाचा- उड्डाणानंतर केबिनमध्ये जळण्याचा वास; एअर इंडिया एक्सप्रेस विमान मस्कतला वळवले

संबंधित घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अभियंत्यांची टीम संबंधित कारणाचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेनंतर संबंधित प्रवाशांना कोचीला आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. याबाबतची माहिती डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने एक निवेदन जारी करत म्हटलं की, मस्कत विमानतळावरील धावपट्टीवर कोचीला जाणाऱ्या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ विमानाच्या क्रमांक दोनच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं आढळून आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. संबंधित प्रवाशांना कोचीला आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. या घटनेची आम्ही सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू.”