सध्या जगभरात करोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारानंतर अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी वाहतूक रोखली आहे. त्यातच आता ब्रिटनहून २४६ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. भारतानेही सुरक्षेच्या कारणास्तवर ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली होती. २३ डिसेंबरला बंद करण्यात आलेली ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात सध्या करोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेले ८२ रुग्ण आहेत. त्यातच बुधवारी भारताने पुन्हा एकदा विमानसेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्याला ३० विमानांचं उड्डाण होणार आहे. यामध्ये भारतातून १५ आणि ब्रिटनमधून १५ उड्डाणं असतील. २३ जानेवारीपर्यंत अशाच पद्धतीने सेवा सुरु राहील अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे.

दिल्ली विमानतळावर ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या शहरात जाण्यासाठी पुन्हा विमानाने प्रवास करताना किमान १० तासांचा वेळ ठेवावा अशी सूचना केली आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बंदी अजून वाढवावी अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “केंद्राने ब्रिटनमधील विमानांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील गंभीर परिस्थिती पाहता ही बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी अशी माझी केंद्राला विनंती आहे. खूप परिश्रम घेतल्यानंतर करोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ब्रिटनमधील परिस्थिती गंभीर आहे. ही बंदी उठवून आपण आपल्या लोकांचा जीव धोक्यात का घालत आहोत?”.

दिल्लीत करोनाच्या नव्या प्रकाराचे १३ रुग्ण सापडले आहेत. ८ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना टेस्टचे पैसे स्वत: भरावे लागणार आहेत. याशिवाय प्रवाशाच्या ७२ तास आधीचा करोना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. निगेटिव्ह असल्यानंतरही प्रवाशाला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावं लागणार आहेत.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india flight with 246 from uk lands in delhi amid new strain worry sgy
First published on: 08-01-2021 at 15:14 IST