Air India Ahmedabad Plane Black Box: एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या बोइंग ७८७ या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. सदर अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सला बरीच हानी पोहोचली आहे. अशात भारतात त्याच्यातील माहिती प्राप्त करणे कठीण होऊन बसले आहे. यासाठी आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठविला जाणार आहे.

‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ यांची एकत्रित माहिती असलेल्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स म्हटले जाते. विमानाच्या मागच्या बाजूला जिथे अपघात झाल्यानंतर तुलनेने कमी धक्का बसण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी ब्लॅक बॉक्स ठेवला जातो. नावात जरी ब्लॅक अशा शब्द असला तरी प्रत्यक्षात हे उपकरण नारिंगी रंगाचे असते.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियाच्या अपघातानंतर १००० अंश सेल्सियसपेक्षाही अधिकचे तापमान निर्माण झाले होते. त्यामुळे ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाले. प्रचंड नुकसान झालेल्या ब्लॅक बॉक्समधून माहिती संपादित करण्याचे तंत्रज्ञान सध्या भारतात उपलब्ध नाही. त्यामुळेच वॉशिंग्टनस्थित असेलल्या नॅशनल सेफ्टी ट्रान्सपोर्ट बोर्ड या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्स पाठविला जाणार आहे.

वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केल्यानंतर त्यातून मिळालेली माहिती भारतीय विमान अपघात तपास संस्थेकडे (AAIB) सोपविली जाईल. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ज्या देशात विमान अपघात घडला, त्याच देशाकडे अपघाताच्या तपासाचे नेतृत्व असते. या नियमानुसार प्रयोगशाळेचा अहवाल भारतीय संस्थेकडे सुपूर्द केला जाईल.

एएआयबीने दिल्ली येथे गेल्याच वर्षी प्रयोगशाळा स्थापन केली होती. मात्र ब्लॅक बॉक्सचे खूपच नुकसान झाल्यामुळे त्यातून माहिती मिळविण्यासाठी प्रयोगशाळा अद्याप सुसज्ज नाही. भारतातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली NTSB सदर ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील त्यांच्या प्रयोगशाळेत घेऊन जाईल, अशी माहिती या प्रक्रियेत सामील असलेल्या एका अधिकाऱ्याने फायनान्शियल डेलीला दिली.

ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय?

विमान अपघातानंतर दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावतो. यातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने संबंधित विमानाचा उड्डाणाचा वेग, उंची, इंजिन कार्य, स्वयंचलित प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींचा तपशील मिळतो. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून वैमानिक आणि सह वैमानिक यांच्यातील संभाषण, अलार्म्स आणि कॉकपिटमधील आवाजांचे विश्लेषण केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एआय-१७१ विमानामधील वैमानिकांनी ६२५ फूट उंचीवरून खाली पडण्यापूर्वी काही सेकंद आधी MAYDAY असा कॉल दिला होता. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरते.