गेल्या वर्षी चीनपेक्षा भारतात हवा प्रदूषणाने जास्त बळी गेले असा दावा ग्लोबल बिझिनेस बर्डन ऑफ डिसीज प्रोजेक्टच्या अहवालात करण्यात आला आहे. २०१५ मध्ये भारतात चीनपेक्षा ५० जण जास्त मरण पावले असे त्यात म्हटले आहे. २०१५ मधील माहितीनुसार भारतात हवा प्रदूषणाने ३२८० लोकांचा ओझोन संहती व सूक्ष्म कणांमुळे दरदिवशी मृत्यू झाला. चीनमध्ये हे प्रमाण ३२३० होते. २०१० मध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण चीनमध्ये ते ३१९०, तर भारतात २८६३ होते.
२००५ मध्ये ते चीनमध्ये ३३३२ तर भारतात २६५४ होते. हवा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू भारतात दशकभरात २३ टक्क्य़ांनी वाढले. चीनमध्ये उलट परिस्थिती असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्य़ांनी कमी झाले आहे. ग्लोबल बिझिनेस बर्डन ऑफ डिसीज प्रोजेक्टच्या अहवालाची मांडणी सियाटलच्या वॉशिंग्टन विद्यापीठाने केली आहे. भारतात अकाली मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढते आहे. ते दिवसाला १९९० मध्ये २१४० होते ते २०१५ मध्ये ३२८० झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत हवा प्रदूषणाने होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण ५३ टक्के वाढले आहे.
चीनपेक्षा ही स्थिती वाईट आहे. तेथे मृत्यूचे प्रमाण १६ टक्के वाढले आहे. ग्रीनपीस इंडियाने स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, आम्ही केलेल्या संशोधनाशी हे निष्कर्ष मिळतेजुळते आहेत व सूक्ष्म कणांचे प्रमाण भारतात चीनपेक्षा जास्त वाढले आहे व त्यावर तातडीने कृतीची गरज आहे. चीनने हवाप्रदूषणावर कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे व भारतातही ती होण्याची गरज आहे असे ग्रीनपीसचे सुनील दहिया यांनी सांगितले.
उपग्रहातून चीन व भारताच्या घेतलेल्या प्रतिमा बघितल्या असता भारतावर हवाई प्रदूषण जास्त तर चीनमध्ये कमी दिसते आहे. चीनमधील प्रदूषण २००५ ते २०१६ या काळात कमी झाले आहे. भारतात मात्र ते वाढतच चालले आहे.