जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात खात्रीलायक कारवाया करीत नाही तोपर्यंत भारत आपल्या सुरक्षेसाठी एअर स्ट्राइकसारखी कडक पावले उचलत राहील, अशा शब्दांत केंद्र सरकारने पाकिस्तानाला पुन्हा एकदा बजावले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, पुलवामा हल्ल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की, भारत नेहमीच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच पाकिस्तानी लष्कर जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलिकडील गोळीबाराच्या आ़डून सातत्याने दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास प्रोत्साहित करीत आहे. मात्र, भारतीय सुरक्षा रक्षक याला सडेतोड उत्तर देत आहेत.

त्याचबरोबर या अहवालात म्हटले की, भारत सीमेपलिकडील दहशतादाचा कायमच टार्गेट झाला आहे. त्याला भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करीत गैरलष्करी पण दहशतवादविरोधात कडक एअर स्ट्राइकची कारवाई केली आहे.

तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना कमी झाल्याचेही संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.