जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेच्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्याच्यासोबत कंदहारला गेले होते हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी फेटाळून लावला आहे. मसूद अझहरच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाचे अपहरण केले होते. दहशतवादी हे विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे घेऊन गेले होते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला डिसेंबर १९९९ मध्ये मसूद अझहरची सुटका करावी लागली. मसूद अझहरला ज्या विमाने कंदहारला नेण्यात आले त्या विमानात अजित डोवाल नव्हते असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अजित डोवाल त्यावेळी गुप्तचर खात्याचे अतिरिक्त संचालक होते. मसूदच्या सुटकेआधीच आयएसआय नियंत्रित अपहरणकर्ते आणि तालिबानी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी अजित डोवाल हे कंदहारला पोहोचले होते.

भारताचे त्यावेळचे तात्कालिन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे मसूद अझहर, ओमर शेख आणि मुश्ताक झारगर या दहशतवाद्यांना घेऊन कंदहारला गेले होते. ओमर शेखने नंतर अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची हत्या केली. आयसी-८१४ विमानातील १६१ प्रवाशांचा प्राण वाचवण्यासाठी वाजपेयी सरकारने मसूद अझहरची सुटका करण्याचा निर्णय घेतला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विमानातील प्रवाशांची हत्या करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती.

मसूदची सुटका करण्याचा निर्णय चांगला होता की, वाईट यावर चर्चा होऊ शकते पण त्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्यावर आरोप करता येऊ शकत नाही असे सूत्रांनी सांगितले. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला भारताच्या तुरुंगात असलेले ३६ दहशतवादी आणि २० कोटी अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती. पण दहशतवाद्यांशी बोलणी करताना डोवाल आणि गुप्तचर खात्यातील अन्य अधिकारी एन.एस.संधू, सी.डी.सहाय यांनी दहशतवाद्यांना त्यांच्या मागण्या मागे घेण्यास भाग पाडले.