पीटीआय, बालासोर

भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान लक्ष्य यशस्वीरित्या रोखले आणि नष्ट केले. स्वदेशी बनावटीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, लाँचर, मल्टी-फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टमसह क्षेपणास्त्र असलेली संपूर्ण शस्त्र प्रणाली कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले.

हेही वाचा >>>जम्मूमधील पूंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीपूर ‘आयटीआर’मधील रडार, ‘टेलिमेट्री’ आणि ‘इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम’द्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रणालीची कार्यक्षमता अचूक असल्याचे निदर्शनास आले. ‘डीआरडीओ’, हवाई दल (आयएएफ), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील (बीईएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चाचणीचे पर्यवेक्षण केले. ‘आकाश-एनजी प्रणाली’ ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, अतिवेगवान हवाई लक्ष्यांना रोखण्यास सक्षम आहे. या यशस्वी चाचणीमुळे आता शस्त्र प्रणालीच्या वापरासाठी चाचण्या घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीसाठी ‘डीआरडीओ’, हवाई दल, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योगांची प्रशंसा करून अभिनंदन केले. यामुळे आपली हवाई संरक्षण क्षमता आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले.