Ali Shamkhani Daughter Wedding Video Iran : लग्नाच्या एका व्हिडीओने इराणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे सरकारविरोधात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्याविरोधात जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अयातुल्ला खोमेनी यांच्या वरिष्ठ सहाय्यकाच्या मुलीने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस गाऊन परिधान केला होता. तसेच हा डीप नेक गाऊन होता. या नववधूचं नाव फातिमा असं असून तिचे वडील अली शमखानी हे खोमेनी यांचे वरिष्ठ सहाय्यक आहेत.
शमखानी हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव आहेत. तेहरानमधील ऐतिहासिक एस्पिनास पॅलेस हॉटेलमध्ये फातिमाचा विवाह पार पडला. व्हिडीओमध्ये दिसतंय की शमखानी हे त्यांच्या मुलीला लग्नाच्या हॉलमध्ये घेऊन जात आहेत. फातिमाच्या लग्नाच्या या व्हिडीओने इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक लोक खोमेनी सरकारच्या दुटप्पी धोरणांवर टीका करत आहेत. एका बाजूला खोमेनी सरकार इराणमधील महिलांना हिजाबशी संबंधित कठोर कायद्यांचं पालन करायला लावत आहेत. दुसऱ्या बाजूला सरकारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबांकडून या कायद्यांची पायमल्ली केली जात आहे.
इराण सरकारच्या दुटप्पी राजकारणावर जनतेची टीका
इराणमध्ये एखाद्या महिलेने हिजाबशी संबंधित कायदा मोडला तर तिला भर चौकात मारझोड करायला मागेपुढे पाहिलं जात नाही. अशातच खोमेनी यांच्या निकटवर्तीयांच्या घरातील तरुणीने या कायद्याला केराची टोपली दाखवली असल्यामुळे खोमेनी सरकारवर जनता संतापली आहे. तसेच इराणमध्ये अलीकडेच हिजाबविरोधात झालेली आंदोलनं शमखानी यांनीच चिरडली होती. त्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हिंसक कारवाईचं नेतृत्व शमखानी यांनीच केलं होतं.
इराणमधून हद्दपार करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मसिह अलीनेजाद यांनी खोमेनी सरकारच्या दुटप्पी धोरणांवर टीका कली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे की “इस्लामिक प्रजासत्ताकमधील मोठे अधिकारी असलेल्या अली शमखानी यांच्या मुलीचा भव्य विवाहसोहळा पार पडला. यावेळी ती स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसली. दुसऱ्या बाजूला इराणमध्ये महिलांचे डोक्यावरचे केस दिसले तरी त्यांना मारहाण केली जाते.
जे लोक आपल्याला पडद्यात राहायला शिकवतात, त्यांच्या स्वतःच्या मुली डिझायनर डीप नेक कपड्यांमध्ये फिरतात. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. नियम हे केवळ तुमच्यासाठी म्हणजेच सर्वसामान्यांसाठी आहेत, त्यांच्यासाठी नाही. हे सरकार ढोंगी आहे.