Aligarh Teacher Student Case : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अलिगडमधील एका हॉटेलच्या खोलीत एक शिक्षक आणि आठवीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, ही मुलगी अल्पवयीन होती. या दोघांनी एका हॉटेलमध्ये जाऊन विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
अलिगडच्या रोरावार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील एका हॉटेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आणि एका शिक्षकाने आपलं जीवन संपवलं आहे. हॉटेलच्या रुममध्ये शिक्षक आणि ८ वीत शिकणाऱ्या या मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेतील २५ वर्षीय शिक्षक चंद्रभानने मथुरा येथून बी.टेकचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो अलिगडच्या सारसोल परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवण्याचं काम करत होता. तसेच मृत विद्यार्थिनी देखील कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असे. आठवीतील ही मुलगी आणि २५ वर्षीय शिक्षक चंद्रभान यांच्यात प्रेमसंबंध होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज एबीपी लाईव्हने दिलं आहे.
दरम्यान, चंद्रभानच्या वडिलांनी सांगितलं की तो सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही. तसेच या घटनेबाबत संबंधित हॉटेल मालकाने सांगितलं की, मृत मुलीने हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी तिच्या खरं नाव लपवलं होतं. तिने आपलं नाव खऱ्या नावाऐवजी मुस्कान असं असून खोट्या नावाचंच आधार कार्ड दाखवलं. सोमवारी सकाळी ८ वाजता शिक्षक आणि ही मुलगी हॉटेलच्या रूम नंबर २०४ मध्ये गेले होते. मात्र, त्यानंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोघेही खोलीतून बाहेर आले नाहीत.
त्यानंतर हॉटेल ऑपरेटरला संशय आला आणि दरवाजा ठोठावला. मात्र, त्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर मास्टर कीने खोली उघडण्यात आली. तेव्हा दोघांचेही मृतदेह आढळून आले. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, या घटनेतील मृतांचे मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. तसेच खोलीत आम्हाला विषाच्या संदर्भात काही गोष्टी आढळून आल्या आहेत.