Allahabad High Court News: जिममध्ये जाणाऱ्या महिलांची सुरक्षा व त्यांचा आत्मसन्मान याकडे कमालीचं दुर्लक्ष होत असल्याची चिंता अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. एका पुरुष ट्रेनरनं जिममध्ये येणाऱ्या एका महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणं, जातीआधारीत टिप्पणी करणं अशा गोष्टी केल्याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदर टिप्पणी केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी करण्यात आलेल्या जिम ट्रेनरनं न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी न्यायालयाने जिमला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भातील घटना २०२४ मध्ये मीरतमध्ये घडली असून ब्रह्मपुरी पोलीस स्थानकात यासंदर्भात पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर सदर जिम ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला या प्रकरणात आरोपी करण्याविरोधात जिम ट्रेनर नितीन सैनी यानं अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागणारी याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीलाच फटकारलं असून महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

पीडित महिलेनं न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिच्याआधी जिमला जाणाऱ्या एका महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ आरोपी जिम ट्रेनरनं काढले होते. हे व्हिडीओ आरोपी पीडित महिलेला पाठवत होता. याशिवाय, आरोपीने आपल्याबाबत जातीआधारीत टिप्पणी केल्याचाही आरोप महिलेनं आरोपीवर ठेवला आहे.

न्यायालयानं काय म्हटलं?

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असली, तरी याबाबत न्यायालयानं आपला दृष्टीकोन व्यक्त केला आहे. “जिमला जाणाऱ्या महिलांची सुरक्षा व आत्मसन्मानाची कोणतीही तजवीज न करता हल्ली पुरुष जिम ट्रेनर महिलांना जिममध्ये ट्रेनिंग देत आहेत. ही फार गंभीर बाब आहे”, असं न्यायालयाने नमूद केलं.

याशिवाय, न्यायालयाने मीरत पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश दिले. त्यात सदर जिम ही कायद्यानुसार नोंदणी झालेली आहे का? याची माहिती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच, आरोपीला सदर प्रकरणात अटक केली आहे किंवा नाही? सदर जिममध्ये महिला ट्रेनर्स आहेत की नाही? याबाबतही माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.