गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास वाराणसी जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी ‘व्यास जी का तहखाना’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या भागात पूजा करण्यात आली. या निर्णयााल स्थगिती देण्याची मागणी ज्ञानवापी मशीद समितीनं अलाहाबाद उच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली असून राज्य सरकारला या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत.
मशीद समितीनं जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. आता उच्च न्यायालयानेही समितीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे तळघरातील पूजा सध्या तरी चालूच राहणार आहे.
जिल्हा न्यायालयानं काय आदेश दिले होते?
बुधवारी ३१ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयानं मशीदीच्या तळघरातील दक्षिणेकडच्या भागात पूजा करण्यास परवानगी दिली. या भागाला ‘व्यास जी का तहखाना’ म्हटलं जातं. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी या ठिकाणी पूजा करण्यात आली. या पूजेचे फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीनं जिल्हा न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घ्यावी म्हणून दाद मागितली. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश पक्षकारांना दिले.
ज्ञानवापी मशीद संकुलात ३१ वर्षांनंतर झाला शंखनाद, हिंदूंना मिळाला पूजेचा अधिकार; ‘व्यासजी का तहखाना’ काय आहे?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात मशीद समितीनं याचिका दाखल केली. तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याच्या निकालाला याचिकेतून आव्हान देण्यात आलं. तसेच, सध्या चालू असणाऱ्या पूजाविधींवर स्थगिती आणली जावी, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली.
१९९३ साली थांबली होती पूजा!
दरम्यान, १९९३ साली म्हणजेच ३० वर्षांपूर्वी तळघरातील ‘व्यास जी का तहखाना’ भागात होणारे पूजाविधी थांबले होते. तोपर्यंत व्यास कुटुंबाकडून या भागात पूजाविधी केले जात होते. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार या भागातील पूजाविधी थांबवण्यात आले होते.