Jeff Bezos On Space Exploration : सध्याच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं. एआय तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांसाठी सोयीचं मानलं जात आहे. मात्र, दुसरीकडे एआयचा फटका लाखो तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाबाबत अनेकदा वेगवेगळे सवालही उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एआयबाबत त्यांचं मत काय आहे? याबाबत भूमिका मांडली आहे. जेफ बेझोस यांनी अलीकडेच इटालियन टेक वीक २०२५ (Italian Tech Week 2025) या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना जेफ बेझोस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अंतराळ संशोधनामुळे जग विनाशाकडे नाही तर समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ‘पुढील दशकात लाखो लोक अंतराळात राहू शकतील’, असा दुर्दम्य आशावाद देखील जेफ बोझेस यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

जेफ बेझोस काय म्हणाले?

“लोक एआयला एवढं का का घाबरतात? हे समजत नाही. पण याबाबत बोलायचं झाल्यास आज जिवंत असलेल्यांनी निराश होऊ नये. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्यामुळे भविष्य आणखी शानदार असेल. खरं तर तंत्रज्ञान विकसित होत असताना पुढे भविष्यात पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत”, असं जेफ बेझोस यांनी म्हटलं.

‘लाखो लोक अवकाशात राहू शकतील’ : जेफ बेझोस

जेफ बेझोस यांनी म्हटलं की, “२०४५ पर्यंत लाखो नाही तर अब्जावधी लोक अवकाशात राहतील. पुढील काही दशकांत हे वेगाने बदलणार आहे. अवकाशात राहणं आता स्वप्न राहिलेलं नाही, ते वास्तवात रूपांतरित होणार आहे. भविष्यात अंतराळात राहणारे लोक त्यांच्या स्वतःच्या इच्छेने तिथे राहतील. त्यांना तिथे राहण्यास भाग पाडले जाणार नाही.”

मानवांची जागा रोबोट घेतील का?

बेझोस पुढे म्हणाले की, “मानव नव्हे तर रोबोट अवकाशात किंवा चंद्राच्या पृष्ठभागावर काम करतील. जर चंद्रावर किंवा ग्रहावर काही करायचं असेल तर तिथे मानवांना पाठवण्याची गरज नाही. आम्ही असे रोबोट पाठवू शकतो जे हे काम खूप प्रभावीपणे करतील.” दरम्यान, यावरून असं स्पष्ट होतं की बेझोस हे तंत्रज्ञानाला मानवी जीवनात भागीदार म्हणून पाहतात, स्पर्धक म्हणून नाही.