गेल्या तीन वर्षांत सुमारे १० हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले. दरम्यान, भाजपा खासदाराने गुरुवारी राज्यसभेत अंबानी आणि अदानी यांची पूजा करावी असे म्हटले आहे. कारण ते ते लोकांना नोकऱ्या देत आहेत.

गुरुवारी, बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी भाजपा खासदार केजे अल्फोन्स यांनी चर्चेत भाग घेत हे वक्तव्य केले आहे. “तुम्ही माझ्यावर भांडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. मी अशा लोकांची नावे घेतो ज्यांनी या देशात नोकऱ्या निर्माण केल्या आहेत कारण तुम्ही सुद्धा त्या लोकांची नावेही घेतली आहेत. रिलायन्स असो, अंबानी असो, अदानी असो, कोणीही असो, त्यांची पूजा केली पाहिजे. कारण त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. हे लोक पैसे गुंतवतात, मग ते अंबानी असोत की अदानी, या देशात पैसा कमावणारा प्रत्येक उद्योगपती रोजगार निर्माण करतो. त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणे आवश्यक आहे,” असे खासदार अल्फोन्स यांनी म्हटले.

“जागतिक असमानता ही वस्तुस्थिती आहे. दोन जणांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. एलॉन मस्कच्या संपत्तीत १०१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुम्हाला याची जाणीव होती का? गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीतही १२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेझोस यांच्या संपत्तीतही ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व टॉप १० मध्ये बिल गेट्स सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती केवळ ३० टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक विषमता ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही ती स्वीकारा किंवा नाही. जगातील तीन अब्ज लोक दिवसाला पाच डॉलरपेक्षाही कमी पैशामध्ये आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे जागतिक असमानता ही वस्तुस्थिती आहे,” असेही केजे अल्फोन्स यांनीही यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आरजेडी खासदार मनोज कुमार झा यांनी सरकारवर निशाणा साधत सरकारने याला अमर काळातील अर्थसंकल्प म्हटले आहे. “गेल्या काही वर्षातील या सरकारची कार्यशैली पाहिल्यावर कोणाला अमृत मिळतंय आणि कोणाला विष मिळतंय हे स्पष्ट होतं. अमृत ​​सरकारच्या मित्रांसाठी आहे आणि पुरेसा पुरवठा आहे, पण बहुतेकांना फक्त विषच मिळत आहे,” असे झा यांनी म्हटले.