H-1B Visa New Rule: अमेरिकेतील नागरिकांना रोजगार मिळावेत, यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसावरील शुल्क एक लाख डॉलर्स एवढे वाढवले. त्यानंतर आता ट्रम्प यांच्या प्रशासनाने आणखी एक धक्का दिला आहे. यापूर्वी एच-१बी व्हिसासाठी लॉटरी काढण्यात येत होती. आता ही लॉटरी प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. नव्या प्रस्तावित प्रक्रियेनुसार आता उच्च तंत्रकुशल आणि उच्च वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना एच-१बवी व्हिसासाठी प्राथमिकता दिली जाणार आहे. प्रस्तावित बदलांनुसार, व्हिसासाठी आता विदेशी कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या वेतन स्तरावर केली जाईल.

उच्च वेतन असणाऱ्यांना संधी

होमलँड सुरक्षा विभागाने या नव्या पद्धतीचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या अमेरिकेकडून दरवर्षी ८५ हजार एच-१बी व्हिसा काढले जातात. जर व्हिसासाठी यापेक्षा अधिक अर्ज आले तर ज्यांना अधिक वेतन आहे, त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पहिली प्राथमिकता दिली जाईल. या निर्णयामुळे विदेशातून स्वस्तात कर्मचारी आणण्यावर रोख लावणे आणि अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याचा हेतू आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, होमलँड सुरक्षा विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या चार वेतन श्रेणी तयार केल्या जातील. ज्यामुळे सर्वात वरच्या श्रेणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना व्हिसा मिळणे सोपे जाईल.

जानेवारी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची कमान सांभाळल्यापासून अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणे आणि अमेरिकन नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, यावर काम सुरू केले आहे. नुकतेच त्यांनी एच-१बी व्हिसावरील शुल्क प्रचंड वाढवले. पूर्वी २५० ते ५००० डॉलर्समध्ये एच-१बी व्हिसावर शुल्क लागत होते. ट्रम्प प्रशासनाने ते खेट एक लाख डॉलर्स इतके केले.

नवा नियम कधी लागू होणार?

नव्या नियमाची अंमलबजावणी २०२६ च्या लॉटरीपासून होऊ शकते, असे सांगितले जात आहे. यापूर्वी पहिल्या टर्ममध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाची प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संघीय न्यायालय आणि वेळ कमी असल्यामुळे ते हे करू शकले नाहीत.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शुल्कातून सूट

दरम्यान, एच-१बी व्हिसाबाबत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एच-१बी व्हिसासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शुल्कातून सूट देण्यात येणार आहे. या संदर्भातील संकेत व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून मिळाले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी हे संकेत दिले आहेत.

अमेरिकेच्या काही दुर्गम भागात काम करण्यासाठी विदेशी प्रशिक्षित डॉक्टरांवर अवलंबून असलेल्या रुग्णालयांसाठी एच १बी व्हिसा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातो.