कोलकाता येथे २००२ मध्ये अमेरिकन सेंटरवर झालेल्या हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन गुन्हेगारांची फाशी रद्द केली आहे. न्यायालयाने यातील प्रमुख आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप दिली आहे, तर दुसऱ्याला ३० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
न्या. ए. के. पटनायक व एफ. एम. इब्राहिम खलिफुल्ला यांनी प्रमुख आरोपी अफताब अहमद अन्सारी व जमैलउद्दीन नासीर यांना दोषी ठरवण्याचा निकाल वैध ठरवला असला तरी या दोघांची फाशी मात्र रद्द केली आहे.
न्यायालयाने बुधवारी याबाबत अन्सारी व नासीर यांनी कोलकाता उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्याचा निर्णय रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या फाशीला २०१० मध्येच स्थगिती दिली होती. मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी एके-४७ रायफलीने अमेरिकन सेंटरवर गोळीबार केला. ही घटना कोलकात्यातील जवाहरलाल नेहरू रोडवर २२ जानेवारी २००२ रोजी घडली होती व त्यात सहा ठार तर १४ जण जखमी झाले होते. कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अन्सारी व सहआरोपी जमीलउद्दीन नासीर हे दोषी असल्याचे सांगून त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली पण इतर तिघांची फाशी रद्द करून त्यांना सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. सत्र न्यायालयाने एप्रिल २००५ मध्ये अन्सारी, नासीर व इतर तिघांना फाशीची शिक्षा देऊन दोघांना सोडून दिले होते. हल्ल्यानंतर चारच दिवसांनी सलीम व जागीद हे दिल्ली पोलिसांच्या पथकाशी झारखंडमधील हजारीबाग येथे झालेल्या चकमकीत मारले गेले होते. अन्सारी कोलकात्यातील हल्ल्यात सामील असल्याचे या दोघांच्या मृत्युपूर्व जबानीतून स्पष्ट झाले होते त्यानंतर अन्सारी याला दुबईतून अटक करून  भारतात आणून खटला भरण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American center attack case sc commutes death sentenc
First published on: 22-05-2014 at 04:37 IST