पीटीआय, हैदराबाद
‘एलि लिली’ ही औषध उत्पादन क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकी कंपनी तेलंगणामध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी दिली. या गुतंवणुकीतून उत्पादन आणि जागतिक औषध पुरवठा क्षमतेत वाढवण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

‘एलि लिली’च्या जागतिक शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि उद्योगमंत्री डी. श्रीधर बाबू यांची हैदराबादच्या ‘इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर’ येथे भेट घेतली. या बैठकीनंतर सरकारने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून यासंबंधी घोषणा केली. कंपनी नवीन औषध उत्पादन कारखाना आणि गुणवत्ता केंद्र उभारणार आहे, त्याद्वारे राज्याच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सरकारी प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कंपनी तातडीने हैदराबादमध्ये भरती सुरू करणार असल्याचीही माहिती सरकारने दिली. त्यामध्ये अभियंते, रसायनशास्त्रज्ञ, विश्लेषणात्मक शास्त्रज्ञ, गुणवत्ता नियंत्रण आणि हमी व्यावसायिक आणि व्यवस्थापन या क्षेत्रामधील पदांचा समावेश असेल.

भारत हा जागतिक पातळीवर क्षमता उभारणीचे केंद्र आहे, असा विश्वास कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि लिली इंटरनॅशनलचे अध्यक्ष पॅट्रिक जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे. तेलंगणातील कारखान्यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, अल्झायमर, कर्करोग आणि स्वयंप्रतिकाराची लक्षणे (ऑटोइम्युन) यावर उपचारांसाठी नव्या औषधांच्या उत्पादनामध्ये कंपनीला रस असल्याचे सांगण्यात आले.

तेलंगणचा व्यवसायावर भर आहे. हैदराबाद हे जागतिक शहर आहे. ज्या कंपन्यांना येथे गुंतवणूक करायची आहे त्यांना आमचे सरकार सहाय्य करेल आणि त्यांचे स्वागत करेल. – ए. रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगण