Truck Drivers : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावत जगातील अनेक देशांना धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांमध्ये सर्वाधिक चर्चा ही टॅरिफची होत आहे. भारतावरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलेलं आहे. एवढंच नाही तर ट्रम्प सातत्याने भारतावर टीका देखील करत आहेत. यातच आता ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेत तब्बल ७ हजार ट्रक चालकांना दणका दिला आहे.
इंग्रजी भाषेच्या चाचण्यांमध्ये ७ हजार ट्रक चालक अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना परवाने देण्यास बंदी घातली आहे. तसेच ट्रक चालकांसाठी आता इंग्रजी बोलण्याची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत ७ हजार ट्रक चालक या चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा भारतीय वंशाच्या चालकांना बसला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, इंग्रजी भाषेतील कौशल्य चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे यावर्षी तब्बल सात हजारांपेक्षा जास्त ट्रक चालकांना परवाने देण्यास नकार देण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी दिली आहे. त्यापैकी हजारो भारतीय वंशाचे ट्रक चालक असून त्यामध्ये बहुतेक पंजाब आणि हरियाणाचे आहेत.
भारतीय ट्रकचालकांशी संबंधित रस्ते अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. या निर्णयाचा अमेरिकेतील भारतीय आणि भारतीय वंशाच्या ट्रक चालकांना मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील या ट्रक चालकांशी संबंधित क्षेत्रात लाखो शीख काम करत असून त्यापैकी सर्वाधिक भारतीय आहेत. वाहतूक सचिव शॉन डफी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं की, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ७,२४८ ट्रक चालकांना सेवेतून काढून टाकण्यात आलं. उत्तर अमेरिकन पंजाबी ट्रकर्स असोसिएशनच्या मते अमेरिकेत काम करणारे सुमारे १,३०,००० ते १,५०,००० ट्रक चालक पंजाब आणि हरियाणातील आहेत. त्यापैकी हजारो ट्रक चालकांना नवीन नियमांचा फटका बसला आहे.
