वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये यंदा २०१९मधील अमेठीच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सोमवारी केला. के सुरेंद्रन हे वायनाडमधून काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. भाकपच्या अ‍ॅनी राजा याही रिंगणात असल्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होण्याची भाजपला अपेक्षा आहे.

राहुल गांधी हे २०१९मध्ये अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात ५५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते. तर, वायनाडमध्ये ते चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी वायनाडमध्ये रालोआच्या उमेदवाराला सात टक्क्यांहून थोडी अधिक मते पडली होती. मात्र, या वेळी राहुल गांधी यांचा पराभव होईल असा विश्वास सुरेंद्रन यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> मोले घातले लढाया : करोनाकाळातील ‘संकटमोचक’

‘‘वायनाडमध्ये विकासाचा प्रश्न आहे, राहुल गांधी यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलेले नाही. राहुल गांधी यांची अवस्था गेल्या वेळी अमेठीत झाली होती तशीच होईल’’, असे सुरेंद्रन म्हणाले. केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. त्यांनी मला वायनाड मतदारसंघामध्ये लढायला सांगितले आहे. ‘इंडिया’ आघाडीचे ज्येष्ठ नेते आपापसात का लढत आहेत असा प्रश्न वायनाडचे नक्की विचारतील, असे ते म्हणाले. सुरेंद्रन हे कोझिकोडे जिल्ह्यातील असून त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे वायनाडचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याविरोधात तीव्र आंदोलनात ते भाजपचा चेहरा होते. ते २०२०पासून भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष आहेत.

दरम्यान, डावे पक्ष विरोधी पक्षाच्या उमेदवार पाहून आपले उमेदवार ठरवत नाहीत असे भाकपच्या अ‍ॅनी राजा म्हणाल्या. त्यांची उमेदवारी राहुल गांधी यांच्या उमेदवारीच्या बरीच आधी जाहीर करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे चार उमेदवार जाहीर भाजपने केरळमध्ये के सुरेंद्रन यांच्यासह एकूण चार उमेदवारांची सोमवारी घोषणा केली. श्री शंकर संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू के एस राधाकृष्णन यांना एर्नाकुलम येथून तर अभिनेते-राजकारणी जी कृष्णाकुमार यांना कोल्लममधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सरकारी विद्यापीठाचे माजी प्राचार्य टी एन सरसू हे अलाथुर येथून भाजपच्या तिकिटवर निवडणूक लढवतील.