सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. याच आंदोलनादरम्यान काल दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसून लाठीचार्ज केला. याच लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस विद्यार्थ्यांना लाठीमार करत असणाऱ्या अशाच एका व्हिडिओला अभिनेता अक्षय कुमार याने लाईक केले आहे. यावरुन अनेकांनी अक्षय कुमारवर टीकेची झोड उठवल्यानंतर त्याने ट्विटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशीरा काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडून दिले. निदर्शकांनी रविवारी सायंकाळी तीन बस पेटवल्या होत्या. या धुमश्चक्रीत सहा पोलीस, दोन अग्निशामक जवान आणि काही विद्यार्थ्यांसह जवळपास १०० जण जखमी झाले. शिवाय, हिंसाचारामुळे मेट्रो रेल्वेची पाच स्थानकेही बंद करण्यात आली. विद्यापीठाच्या आवारातून पोलिसांवर दगडफेक होत होती, त्यामुळे निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला, यानंतर पोलिसांना काही उपद्रवी शक्तींनी विद्यापीठात घुसखोरी केल्याच्या संशय आल्याने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवाराच्या बाहेर काढले. शिवाय पोलिसांनी काही निदर्शकांना देखील ताब्यात घेतले होते. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये पोलिस विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहे. हाच व्हिडिओ अक्षय कुमारने लाईक केल्याचे नेटकऱ्यांच्या लक्षात आले आणि त्याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होऊ लागला.

हे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर अक्षयनेच ट्विटवरुन या लाईक संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. “जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसंदर्भातील ट्विटला मी चुकून लाईक केले. मी ट्विटवर स्क्रोअल करत असताना चुकून ते लाईक बटण दाबले गेले असणार. मला जेव्हा असं घडल्याचं जाणवलं तेव्हा मी लगेच ते ट्विट अनलाईक केलं. मी कोणत्याही प्रकारे अशा कृत्याचे समर्थन करणार नाही,” असं ट्विट अक्षयने केलं आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबरोबर देशातील वेगवगेळ्या भागांमध्ये नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन देशातील नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.“सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.