Amir Khan Muttaqi remark on Afghan Sikhs and Hindus : अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू व शिखांच्या एका शिष्टमंडळाने भारत दौऱ्यावर आलेले तालिबानी नेते आमिर खान मुत्ताकी यांची नुकतीच नवी दिल्ली येथील अफगाणिस्तानच्या दुतावासात जाऊन भेट घेतली. अफगाणी शीख व हिंदुंनी तालिबानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांच्याकडे मागणी केली की त्यांच्या सरकारने अफगाणिस्तानमधील हिंदुंची मंदिरं, शिखांचे गुरुद्वारा व इतर अल्पसंख्याकांची प्रार्थनास्थळं, धार्मिक स्थळं दुरुस्त करावी, त्यांची डागडुजी करून त्यांना सुरक्षा पुरवावी. तिथल्या प्रशासनात अल्पसंख्याकांना स्थान देण्याची मागणी देखील शिष्टमंडळाने यावेळी केली.

हिंदू व शिखांच्या शिष्टमंडळाला आमिर खान मुत्ताकी यांनी आश्वस्त केलं की आम्ही अफगाणिस्तानमधील तुमच्या धार्मिक स्थळांची दुरुस्ती करून देऊ, तसेच तालिबान सरकार या स्थळांना सुरक्षा प्रदान करेल. मुत्ताकी यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील प्रतिनिधी गुलजीत सिंग यांनी दी प्रिंटशी बातचीत करताना याबाबतची माहिती दिली.

तालिबान सरकारमध्ये हिंदू व शीख प्रतिनिधीला स्थान मिळणार?

गुलजीत सिंग म्हणाले, “आम्ही मुत्ताकी यांना विनंती केली की तुमच्या तालिबानी सरकारमध्ये अल्पसंख्याक समुदायाचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करा. कमीत कमी एक हिंदू व एका शीख व्यक्तीला सरकारमध्ये नियुक्त करावं.”

दिल्लीमधील मनोहर नगरमधील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजींचे अध्यक्ष गुलजीत सिंग म्हणाले, “अफगाणिस्तानमध्ये अनेक गुरद्वारे आणि मंदिरं आहेत, ज्यांची दुरवस्था झाली आहे, भिंती खराब अवस्थेत आहेत, काही वास्तू मोडखळीस आल्या आहेत त्यांचं जनत व्हावं, दुरुस्ती व देखभाल केली जावी अशी विनंती आम्ही मुत्ताकी यांच्याकडे केली आहे. त्यांनी आमची मागणी मान्य केली आहे. “

मुत्ताकी यांचं हिंदू व शिखांना अफगाणिस्तानमधील धार्मिक स्थळांच्या भेटीचं निमंत्रण

यावेळी मुत्ताकी यांनी शिष्टमंडळातील लोकांना, अफगाणी शीख व हिंदूंना आवाहन केलं की “तुम्ही अफगाणिस्तानमध्ये तुमच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकता. आम्ही तुमचं स्वागत करू. तुमच्यासाठी व्हिसाची प्रक्रिया सुलभ करण्याकडे आम्ही लक्ष देऊ.”

दरम्यान, मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान सोडून गेलेल्या शीख व हिंदू समुदायातील लोकांना आवाहन केलं की तुम्ही मायदेशी (अफगाणिस्तान) परत येऊ शकता, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करू शकता. अफगाणिस्तानात तालिबान सरकारकडून तुमचं स्वागत केलं जाईल.