गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांचे पुत्र जय शहांचा उल्लेख ‘स्टार्ट अप इंडियाचे आयकॉन’ म्हणून केला. ‘तुम्ही ‘स्टार्ट अप इंडिया’बद्दल ऐकले आहे का? ‘स्टार्ट अप इंडिया’चे आयकॉन जय शहांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?’ असे प्रश्न उपस्थितांना विचारत राहुल गांधींनी एकाचवेळी मोदी-शहा जोडीवर निशाणा साधला.

अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले. याचा संदर्भ घेऊन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘जय शहा यांच्या कंपनीच्या उलाढालीत एकाच वर्षात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मात्र याबद्दल चौकीदार शांतच आहेत. त्यांना अशा गोष्टींवर बोलायला आवडत नाही,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधीनी भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तोंडसुख घेतले. ‘भाजप आणि संघाकडून महिलांना असमान वागणूक दिली जाते,’ असे म्हणत तुम्ही संघाच्या शाखेवर एखाद्या महिलेला शॉर्ट्समध्ये पाहिले आहे का?, असा सवालदेखील त्यांनी विचारला. ‘संघ ही भाजपची मूळ संघटना आहे. त्यामध्ये किती महिला आहेत. संघाच्या शाखेत मी आजपर्यंत एकाही महिलेला शॉर्ट्समध्ये पाहिलेले नाही,’ असे राहुल गांधींनी म्हटले. ‘महिलांनी कायम शांत रहावे, असे भाजपला वाटते. महिला जोपर्यंत शांत असतात, तोपर्यंत यांना अडचण जाणवत नाही. मात्र त्यांनी एखाद्या मुद्यावर स्वत:चे मत व्यक्त केल्यावर, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होतात,’ अशा शब्दांमध्ये राहुल यांनी भाजप आणि संघावर टीका केली.

गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास महिला सक्षमीकरणास प्राधान्य दिले जाईल. शिक्षण, आरोग्य सुविधा यांच्यावर काँग्रेसकडून लक्ष केंद्रीत केले जाईल,’ असे राहुल गांधींनी म्हटले. तुम्हाला नेमके काय हवे आहे, हे तुम्हाला मोदींनी कधी विचारले का?, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला.