पीटीआय, लखीमपूर

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात चीनने भारताच्या एक इंच जमिनीवरही अतिक्रमण केलेले नाही, असे स्पष्ट करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. १९६२मधील चीन आक्रमणाच्या काळात नेहरूंनी अरुणाचल आणि आसामला कसे ‘बाय-बाय’ केले होते, हे लोक विसरलेले नाहीत, असे शहा म्हणाले.

लखीमपूर येथे प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशाबरोबरच सीमा संरक्षित केली आणि तेथून होणारी घुसखोरी थांबवली आहे. चीनच्या १९६२च्या आक्रमणावेळी नेहरू यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला बाय-बाय केले होते, ही गोष्ट या राज्यातील लोक विसरू शकत नाहीत. पण आता चीन भारताच्या एका इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही. किंबहुना डोकलाममध्ये आम्ही चीनला मागे रेटले.’’

हेही वाचा >>>महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

आसामची बांगलादेशशी असलेली सीमा घुसखोरीसाठी आधीपासून खुलीच ठेवली होती, पण नंतर केंद्रात मोदी सरकार आले आणि आसाममध्ये हिमंता बिस्व सरम यांचे सरकार आले. त्यामुळे आता सीमेवरून होणारी घुसखोरी थांबली आहे, असा दावा शहा यांनी केला.

आसाममधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने राज्यावर अन्याय केला आणि विविध हिंसक तसेच बंडखोरीशी संबंधित विविध घटनांमध्ये असंख्य तरुण मारले गेले. परंतु गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात नऊ हजार तरुण शरण आले आहेत, असेही शहा म्हणाले.