“पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा अन्य कोणताही नेता तुरुंगातून देशाचा कारभार चालवू शकतात का,” असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले. शहा यांनी सोमवारी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

पाच किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या, गंभीर आरोपांवरून ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असलेले पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यातील मंत्री यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेल्या राज्यघटना (१३०वी सुधारणा) विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, या घटनादुरुस्ती विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेकजण पाठिंबा देतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. घटनात्मक नैतिकता आणि जनतेचा विश्वासाला आधार देणे हा विधेयकाचा हेतू असल्याचे शहा म्हणाले. विधेयकामध्ये पंतप्रधानपदाचा समावेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या हे विधेयक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ३१ सदस्य आहेत.

आरोपानंतर लगेचच राजीनामा

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने समन्स बजावल्यानंतर आपण दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. या खटल्यातून आपली निर्दोष सुटका होईपर्यंत आपण कोणत्याही पदावर नव्हतो, अशी आठवण अमित शहा यांनी करून दिली. राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना दिलासा देण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी अध्यादेश आणला होता, तो तेव्हा राहुल गांधी यांनी फाडला होता. राहुल यांची ती नैतिकता कुठे गेली असा प्रश्नही शहा यांनी विचारला.

केजरीवाल यांचे उत्तर

“अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधीचा खटला सुरू असताना, ते तुरुंगात असल्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा द्यावा असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. पण घटनेत तशी तरतूद नव्हती,” असे म्हणत शहा यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. त्यावर, “आपल्या पक्षामध्ये भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देणाऱ्यांनीही राजीनामा द्यायला हवा का,” असा प्रतिप्रश्न करत केजरीवाल यांनी शहा यांना प्रत्युत्तर दिले.

मला संपूर्ण देश आणि विरोधकांना विचारायचे आहे, एक मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा अन्य कोणताही नेता तुरुंगातून देश चालवू शकतो का? हे आपल्या लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धरून आहे का? आजही त्यांचा प्रयत्न असा आहे की, ते तुरुंगात गेले तरी त्यांना तुरुंगातूनही सहज सरकार स्थापन करता येईल. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

धनखड यांचा राजीनामा आरोग्याच्या कारणावरूनच

जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणावरूनच राजीनामा दिला आहे, त्यावरून अनावश्यक चर्चा करण्याची गरज नाही अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावला. धनखड यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. तसेच ते सध्या कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही अशी विचारणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्याला अमित शहा यांनी या मुलाखतीत उत्तर दिले.