काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील ‘व्होटर अधिकार यात्रे’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची दिवंगत आई यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. बिहारमधील ‘घुसखोर बचाव यात्रे’मुळे राहुल गांधी यांचे राजकारण खालच्या पातळीवर गेल्याची टीकादेखील शहा यांनी केली. ते राजभवनच्या नवनिर्मित ब्रह्मपुत्र शाखेचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
दरभंगा शहरात यात्रेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने व्यासपीठावरून मोदींविरोधात हिंदीत अपशब्द वापरल्याची एक कथित चित्रफीत समोर आल्यानंतर काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधींमध्ये थोडीही लाज शिल्लक असेल तर त्यांनी पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत आई आणि देशातील जनतेची माफी मागावी. देश त्यांच्याकडे आणि त्यांच्या पक्षाकडे द्वेषाने पाहात आहे, असे शहा म्हणाले.
सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात मोदींच्या आईला शिवीगाळ करणे यापेक्षा मोठे पतन असू शकत नाही. काँग्रेसचे मुद्दाविहीन आणि द्वेषाने भरलेले राजकारण लोकांच्या नजरेत पक्षाचे स्थान उंचावणार नाही तर ते रसातळाला नेणारे आहे, असेही शहा म्हणले. दरम्यान, ब्रह्मपुत्र शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल लक्ष्मी प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा उपस्थित होते.
‘घुसखोर बचाव यात्रा’ ही काँग्रेसच्या मतपेढीचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु कोणत्याही लोकशाहीमध्ये निवडणुका हा त्याचा आत्मा आहे. जर घुसखोरांना मतदार यादीत त्यांची नावे नोंदवून व्यवस्था प्रदूषित करण्याची परवानगी दिली तर देश कसा सुरक्षित राहू शकेल?- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
कोणताही अपशब्द कमळ फुलण्यापासून रोखू शकत नाही
मोदींना शिवीगाळ करणे नवी बाब नसून हा प्रकार ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून सुरू असल्याचा दावा शहा यांनी केला. सोनिया गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भूतकाळात पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरले आहेत तथापि, कोणताही अपशब्द कमळ फुलण्यापासून रोखू शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी शिवीगाळ केली पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा शहा यांनी केला.