गोपालगंज : विधानसभा निवडणुकीत मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा विकासाचा अजेंडा आणि राष्ट्रीय जनता दलाचे ‘जंगल राज’ यांच्यातून निवड करायची आहे, असे मत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केले. नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार बिहारचा विकास करतील तर राजदच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची आघाडी राज्यात पुन्हा एकदा ‘जंगल राज’ घेऊन येईल असा दावा शहा यांनी केला.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान ६ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी प्रचार संपायला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. अमित शहा यांनी शनिवारी गोपालगंज, समस्तीपूर आणि वैशाली जिल्ह्यांमध्ये दूरदृश्य प्रणालीने प्रचारसभा घेतल्या. हवामान बिघडल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष जाऊन प्रचारात सहभागी होता आले नाही.
गोपालगंज हा राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचा जिल्हा आहे. माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा भाऊ सुभाष यादव यांनी गोपालगंजमध्ये मनमानी केली होती, अशी टीका करत शहा यांनी राजद पुन्हा सत्तेत आल्यास जंगल राज परत येईल, असा इशारा दिला.
यावेळी शहा यांनी रालोआच्या जाहीरनाम्याचे मुद्देही मांडले. या जाहीरनाम्यात शेतकरी आणि महिलांसाठी विशेष योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
