पीटीआय, मुंबई
अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या ‘बोइंग-७८७’ विमानांतील आणीबाणीच्या काळात सुरू होणारी ‘रॅम एअर टर्बाईन’ (रॅट) यंत्रणा अनपेक्षितरीत्या सुरू झाल्याची घटना शनिवारी घडली. बर्मिंगहॅम येथे उतरताना ५०० फुटांवर असताना हा प्रकार घडला. विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरले असल्याची माहिती ‘एअर इंडिया’ने दिली आहे.

दरम्यान, वैमानिकांच्या संघटनेने (एफआयपी) ‘देशातील सर्व ‘बोइंग-७८७’ विमानांतील इलेक्ट्रिक यंत्रणा संपूर्ण तपासावी,’ अशी विनंती नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे.

अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणारे ‘एअर इंडिया’चे ‘बोइंग-७८७’ विमान उतरताना आणीबाणीच्या काळातील ‘टर्बाइन पॉवर’ अनपेक्षितरीत्या सुरू झाले. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ‘एफआयपी’ने या संदर्भात ‘डीजीसीए’ला पत्र लिहिले आहे. विमानांचे दोन्ही इंजिन किंवा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा हायड्रॉलिक यंत्रणा निकामी झाली, तर ‘रॅम एअर टर्बाइन’ आपोआप सुरू होते. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून आणीबाणीच्या काळात ही यंत्रणा ऊर्जानिर्मिती करते.

या घटनेनंतर ‘एअर इंडिया’ने बर्मिंगहॅम-दिल्ली विमान तपासणीसाठी रद्द केले आहे. ‘एअर इंडिया’ने म्हटले आहे, ‘विमान क्रमांक एआय-११७, अमृतसर-बर्मिंगहॅममधील क्रू सदस्यांना ४ ऑक्टोबर रोजी विमानातील ‘रॅम एअर टर्बाइन’ यंत्रणा बर्मिंगहॅम येथे उतरताना अंतिम टप्प्यात सुरू झालेली आढळली. सर्व विद्युत आणि हायड्रॉलिक यंत्रणा सामान्य रीतीने काम करीत होत्या. विमान सुरक्षितरीत्या बर्मिंगहॅम येथे उतरले.’ विमानात किती प्रवासी होते यांसह इतर माहिती ‘एअर इंडिया’ने दिलेली नाही.

या घटनेनंतर ‘एअरक्राफ्ट हेल्थ मॉनिटरिंग’ने सदोष ‘बस पॉवर कंट्रोल युनिट’ काढले, असे ‘एफआयपी’चे अध्यक्ष जी. एस. रंधवा यांनी पत्रात म्हटले आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेनंतर ‘एफआयपी’ सातत्याने बी-७८७ विमानांची संपूर्ण तपासणी करण्याची मागणी करीत आहे. अहमदाबाद येथील अपघातानंतर ‘डीजीसीए’ने केवळ इंधन नियंत्रक स्विचेसची तपासणी केली होती. अहमदाबाद येथे या वर्षी जून महिन्यात झालेल्या अपघातामागे दोन्ही इंजिन किंवा हायड्रॉलिक, विद्युत यंत्रणा संपूर्ण निकामी होणे किंवा सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असण्याचे कारण मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या अपघाताची ‘विमान अपघात तपास ब्यूरो’ (एएआयबी) चौकशी करीत आहे. ‘एएआयबी’च्या प्राथमिक चौकशीत बोइंग-७८७-८ विमानातील इंधन नियंत्रक स्विचेस उड्डाणानंतर बंद पडले होते. वैमानिकांनी हे स्विच बंद केले नसल्याचे त्यांच्या संवादातून पुढे आले होते.