Amritsar Explosion News : पंजाबच्या अमृतसरमधील मजीठा बायपासजवळ एक मोठा स्फोट झाला आहे. एक इसम या भागात बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता. मात्र बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटात सदर इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या स्फोटाचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्फोट झाला त्या ठिकाणी तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे तो परिसर अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतो.
मजीठा बायपास रोडजवळ सकाळी सव्वानऊच्या दरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. हा इसम स्फोटकं घेऊन कुठे जात होता हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस व त्यांचं फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत आहे.
स्थानिक नागरिक काय म्हणाले?
स्थानिकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की “आम्हाला सकाळी सव्वानऊच्या दरम्यान स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आम्ही येथे (घटनास्थळी) आलो. एक इसम आम्हाला गंभीर जखमी अवस्थेत इथे दिसला. त्यानंतर आम्ही पोलीस व रुग्णवाहिकेला पाचारण केलं. या स्फोटामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे”.
पोलिसांनी काय सांगितलं?
दरम्यान, पंजाब पोलिसांनी सांगितलं की आम्हाला केवळ एक व्यक्ती इथे जखमी अवस्थेत आढळल्याची माहित मिळाली होती. त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. स्फोट झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. आमची फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. आम्ही जखमी इसमाला रुग्णालयात नेलं आहे. प्रथमदर्शनी तोच आमचा या प्रकरणातील आरोपी आहे.
अमृतसरमध्ये खळबळ
या महिन्याच्या सुरुवातीला भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं. दोन्ही देशांच्या हवाई दलांनी एकमेकांच्या हद्दीत हल्ले केले होते. भारताचे हल्ले पाकिस्तान थोपवलू शकला नव्हता. मात्र, पाकिस्तानची क्षेपणास्रं भारतीय लष्कराने हवेतच निष्प्रभ केली होती. हे युद्ध थांबत नाही तोच आता पंजाबमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताने खळब उडाली आहे.