Amritsar Temple Grenade Attack Case: पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सोमवारी (१७ मार्च) सकाळी पोलिसांनी दोन पैकी एका हल्लेखोराला चकमकीत ठार केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपीचे नाव गुरसिदक ऊर्फ सिदकी ऊर्फ जगजीत सिंग असे आहे. तर त्याचा साथीदार चुई ऊर्प राजू सध्या फरार आहे.

अमृतसर येथील विमानतळ मार्गावर हल्लेखोर आणि अमृतसर पोलीस यांच्यात आज सकाळी चकमक झाली. ज्यात एका हल्लेखोराला ठार करण्यात आले. आता घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचत आहेत.

शुक्रवारी रात्री ठाकूरद्वारा मंदिराबाहेर ग्रेनेड फेकण्यात आला होता. त्यावेळी मंदिराचा पुजारी आतमध्ये झोपला होता. या हल्ल्यात पुजारी सुखरूप वाचला. पोलिसांनी मंदिराबाहेर सीसीटीव्ही हस्तगत करून त्यात दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले असल्याचे सांगितले होते. रात्री १२.३५ वाजता दोन हल्लेखोर दुचाकीवरून मंदिराजवळ आले. यावेळी त्यांच्या हातात एक झेंडा होता. थोडा वेळ मंदिराबाहेर थांबल्यानंतर त्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका व्यक्तीने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात पाच जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काही दिवसांनी ठाकूरद्वारा मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.

ठाकूरद्वारा मंदिरावरील हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “काही समाजकंटकांकडून पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. अमली पदार्थाची तस्करी हा त्यातलाच एक प्रकार आहे. मोगा येथे गेल्या काळात घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला होता. पंजाब पोलीस याही घटनेचा नक्कीच तपास करतील आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच ड्रोनद्वारे पंजाबमधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असतो. पंजाबमधील शांतता त्यांच्यासाठी सोयीची नाही.