गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोविड-१९च्या साथीनं थैमान घातलं आहे. लाखो लोकांचे करोनामुळे जीव गेले असून अजूनही करोनाचे नवनवे व्हेरिएंट येत असल्यामुळे हे संकट नेमकं कधी संपेल? याच चिंतेत जगभरातले नागरिक आणि आरोग्य यंत्रणा आहेत. नुकताच दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे या चिंतेत भरच पडली असून अजूनही या व्हेरिएंटच्या घातकतेचा अभ्यास संशोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर महिंद्रा ग्रुपचे संचालक आणि प्रथितयश उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी क्रश कोविड नावाच्या ट्विटर हँडलवरील एक ट्वीट रीशेअर केलं आहे.

काय आहे या ट्वीटमध्ये?

आनंद महिंद्रा त्यांच्या हटके ट्वीट्समुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे ट्वीट बरेच व्हायरल देखील होत असतात. आज दुपारी त्यांनी केलेलं ट्वीट देखील व्हारल होऊ लागलं आहे. या ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा यांनी करोनामुळे घाबरू जाण्याची वेळ गेल्याचं सूचोवाच केलं आहे. “घाबरून जाणं थांबवण्याची वेळ आली आहे”, असं आनंद महिंद्रांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शेअर केलेल्या ट्वीटमध्ये काय?

दक्षिण अफ्रिकेत आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या नेटकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड फ्रेडलँड यांच्या विधानांविषयी या ट्वीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. करोना साथीचा प्रभाव कमी झाल्याचा दावा या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे.

“जर दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हिटी रेट पाहिला असेल, तर आत्तापर्यंत रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भरती होण्याचं प्रमाण दिसायला हवं होतं, पण ते दिसत नाहीये. आपल्या (दक्षिण अफ्रिका) प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रामुख्याने ३० वर्षांच्या खालच्या रुग्णांचा समावेश आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्पॅनिश फ्लूच्या बाबतीतही हेच घडलं होतं!”

“त्यामुळे मला असं वाटतंय की इथे एक सीमारेषा आहे आणि हे कदाचित कोविड-१९ संपल्याचं लक्षण असेल. हा वेगाने फैलाव होणारा प्रकार आहे, मात्र त्यामुळे आता गंभीर आजार होण्याचा धोका नाही. स्पॅनिश फ्लूच्या बाबतीत देखील हेच झालं होतं”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.