scorecardresearch

“…तर आपल्या नावे गोल्ड मेडल आणि नवा विश्वविक्रम असता”, लसीकरणाविषयी आनंद महिंद्रांचं ट्वीट!

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देशात झालेल्या विक्रमी लसीकरणावरून ट्वीट करत या मोहिमेचं कौतुक केलं आहे.

anand mahindra tweet on vaccination in india
उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं भारतातील लसीकरणाविषयी ट्वीट!

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर हटके ट्वीट करत असतात. त्यांचे हे ट्वीट लगेच व्हायरल होतात. मग ते क्रिकेट सामन्यांविषयी असोत, एखाद्या व्हायरल झालेल्या व्हिडीओविषयी असोत किंवा मग देशातल्या राजकीय परिस्थितीविषयी असोत. आनंद महिंद्रा यांचा या सगळ्या मुद्द्यांकडे बघण्याचा आणि त्यांचा अर्थ लावण्याचा दृष्टीकोन नेटिझन्सच्या विशेष पसंतीस पडत आहे. आता देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेविषयी आनंद महिंद्रांनी केलेलं एक नवीन ट्वीट विशेष चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्र उलटल्यानंतर त्यांनी हे ट्वीट केलं असून त्याला शेकडो रीट्वीट देखील मिळाले आहेत.

मोदींच्या वाढदिवशी विक्रमी लसीकरण

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आलं. यावेळी जवळपास अडीच कोटी लसींचे डोस देण्यात आले. आत्तापर्यंत एका दिवशी देण्यात आलेल्या डोसचा हा फक्त भारतातीलच नाही, तर जगभरातील उच्चांक आहे. त्यामुळे या कामगिरीबद्दल देशभरात चर्चा सुरू असून केंद्र सरकारचं कौतुक केलं जात आहे. लसीकरणाच्या वाढत्या वेगाबाबत बोलताना विरोधकांकडून मोदींच्या वाढदिवसासाठीच १५ ते २० दिवस लसीकरणाचा वेग कमी ठेवल्याची देखील टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

व्हॅक्सिन ऑलिम्पिक…!

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्हॅक्सिन ऑलिम्पिकचा उल्लेख केला आहे. “काही दिवसांपूर्वी मी म्हटलं होतं की आपण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतका लसीकरणाचा टप्पा दर तीन दिवसांनी पूर्ण करत आहोत. काल आपण एकाच दिवशी ऑस्ट्रोलियाच्या संपूर्ण लोकसंख्येइतका टप्पा ओलांडला आहे. जर एखादी व्हॅक्सिन ऑलिम्पिक असती, तर आपण सर्वोच्च स्थानी असतो. आपल्या नावे गोल्ड मेडल आणि नवा विश्वविक्रम असता..”, असं आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

५९ कोटींहून अधिक नागरिकांना पहिला डोस

आपल्या ट्वीटसोबत त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पोर्टलवरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये कालच्या दिवसभरात २ कोटी ५० लाख ३ हजार ७८४ डोस देण्यात आल्याची आकडेवारी दिसत आहे. आत्तापर्यंत पहिल्या डोसची संख्या ५९ कोटी ५७ लाख ९१ हजार ९९७ झाली असून दुसरा डोस पूर्ण झाल्याची संख्या १९ कोटी ७५ लाख २० हजार ४४३ इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2021 at 12:36 IST

संबंधित बातम्या