नवी दिल्ली : प्राचीन संस्कृत तत्त्वग्रंथ ‘योग वशिष्ठ’चे रशियन भाषांतर शुक्रवारी भारतीय विद्या भवन येथे झालेल्या ‘भारत आणि रशिया-शैक्षणिक व सांस्कृतिक नातेसंबंध’ या परिसंवादादरम्यान प्रकाशित करण्यात आले. हा कार्यक्रम भवनच्या“नंदलाल नुवाल सेंटर ऑफ इंडॉलॉजी’ आणि मॉस्कोस्थित ‘ऋषि वशिष्ठ इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केला होता.
हे भाषांतर ‘ऋषि वशिष्ठ इन्स्टिट्यूट’ने केले असून, ते भारत-रशिया सांस्कृतिक सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारतीय विद्या भवन आणि मॉस्को येथील ‘ऋषि वशिष्ठ इन्स्टिट्यूट’ यांच्यात संस्कृत अभ्यास, भाषांतर प्रकल्प, शैक्षणिक देवाणघेवाण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संयुक्त संशोधन उपक्रम यांना अधिक गती देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्याला पंजाब व तामिळनाडूचे माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवनचे उपाध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, रशियातील स्वामी विष्णुदेवानंद गिरी, ऋषि वशिष्ठ इन्स्टिट्यूटचे संचालक दिमित्री माक्साकोव्ह, नंदलाल नुवाल सेंटर ऑफ इंडॉलॉजीच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. शशिबाला, तसेच इन्स्टिट्यूटच्या भारतीय तत्त्वज्ञान विभागाच्या अधिष्ठाता ओल्गा कोसेन्को आदी उपस्थित होते.
भारत आणि रशिया भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी दोन्ही देशांची मने मात्र एकसारखी आहेत. ऋषि वशिष्ठ इन्स्टिट्यूट म्हणजे भारतीय सांस्कृतिक संपत्तीचा खरा विश्वस्त असे पुरोहित म्हणाले. वैदिक अध्ययन व संस्कृत भाषांतराची परंपरा रशियामध्ये जोमाने चालू असली तरी, या प्रयत्नांची जाणीव १४० कोटी भारतीयांमध्ये अद्याप मर्यादित आहे, अशी खंत पुरोहित यांनी व्यक्त केली. स्वामी विष्णुदेवानंद गिरी यांनी भारतीय संस्कृती आणि अद्वैत वेदांतावर विचार मांडले, तर डॉ. शशिबालांनी ‘योग वसिष्ठ’ ग्रंथाचे सार्वत्रिक महत्त्व अधोरेखित केले.