Wife Allegedly Murdered Husband: राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या काही आठवड्यांनंतर, आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एका तरुणाची लग्नाच्या एका महिन्यातच हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या एक महिन्यानंतर तरुणाचा मृतदेह आढळला असून, त्याची नवविवाहित पत्नी आणि तिच्या आईला पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेतील मृत तरुण तेजेश्वरचे १८ मे रोजी लग्न झाले होते. त्यानंतर एक महिन्याने, १७ जून रोजी, तो बेपत्ता झाला होता. आता त्याचा मृतदेह कालव्यात सापडला आहे. पीडित तेजेश्वर खाजगी जमीन सर्वेक्षणाचे आणि नृत्य शिक्षक म्हणून काम करायचा.
तेजेश्वरच्या कुटुंबीयांनी त्याची पत्नी ईश्वर्या हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तसेच तेजेश्वरच्या हत्येचा कटही तिनेच रचल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी ईश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, चौकशी सुरू आहे, परंतु पोलिसांनी तेजेश्वरच्या कुटुंबियांच्या आरोपांवर बोलण्यास नकार दिला आहे.
तेजेश्वरच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ईश्वर्याची आई सुजाता एका बँकेत काम करते. ईश्वर्याचे एका बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते, असा दावा त्यांनी केला. त्याचप्रमाणे, ती तेजेश्वरसोबतही प्रेमसंबंधात होती आणि दोघांनाही लग्न मान्य होते. त्यांचे लग्न फेब्रुवारीमध्येच होणार होते, परंतु ईश्वर्या काही दिवस बेपत्ता झाली होती, त्यामुळे ते पुढे ढकलावे लागले होते. परतल्यानंतर ईश्वर्याने, तिचे तेजेश्वरवर प्रेम असल्याचे सांगत त्याच्याशी लग्न केले होते.
तेजेश्वरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर्याच्या आईचा या लग्नास विरोध होता. त्याचबरोबर त्यांनी तेजेश्वरला ईश्वर्याशी विवाह करू नये असा इशारा दिला होता. परंतु तो ईश्वर्याशी लग्न करण्यावर ठाम होता. आता तेजेश्वरच्या कुटुंबीयांना संशय आहे की, नवविवाहित ईश्वर्या आणि तिच्या आईने त्याच्या हत्येचा कट रचला आहे.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी याची हनिमूनसाठी मेघालयला गेल्यानंतर, त्याची पत्नी सोनम रघुवंशीने हत्या केली होती. या हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत असताना तेजेश्वर याच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे.
राजा रघुवंशीच्या हत्याप्रकरणात कट रचल्याबद्दल त्याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन हल्लेखोरांना मेघालय पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.