आंध्र प्रदेशमधील मॉल आणि व्यावसायिक संकुलांमध्ये तेलगू भाषेतील फलक लावावे असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. तुम्ही फलकावर इंग्रजी, हिंदी किंवा अगदी चिनी भाषेचा वापर करा पण मातृभाषेला विसरु नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मंगळवारी आंध्र प्रदेशमधील १३ रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पांसाठी सुमारे ४,१५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई. एस. एल नरसिंहन आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

कार्यक्रमात व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशमधील तेलगू भाषेतील फलकाचा मुद्दा उपस्थित केला. मॉल आणि व्यावसायिक संकुलांमध्ये तेलगू भाषेतील फलक लावावे. तेलगूसह तुम्ही इंग्रजी, हिंदी किंवा चिनी भाषेचा वापर करु शकता, पण मातृभाषेतील फलक हवाच असे त्यांनी सांगितले. तुम्ही कोणतीही भाषा शिकू शकता, पण मातृभाषा विसरु नका. मी, चंद्राबाबू नायडू किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही कोणीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. राष्ट्रीय महामार्ग आणि जलवाहतुकीमुळे आंध्र प्रदेशच्या विकासात हातभार लागेल असे त्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशपूर्वी कर्नाटकात कन्नड फलक लावण्याची मागणी झाली होती. यावरुन प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनही केले होते. तर महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षांनी वेळोवेळी मराठी भाषेतील फलकांची मागणी लावून धरली आहे. आता उपराष्ट्रपतींनीच अप्रत्यक्षपणे तेलगू भाषा सक्तीची मागणी केली आहे.