आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजुर करण्यात आले. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं होतं. आवाजी मतदानानं हे विधेयक सोमवारी मंजुर करण्यात आलं. या विधेयकानुसार विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी, अमरावती विधीमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. तसंच चर्चेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई करत अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबितदेखील केलं होतं. याविरोधात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केलं. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

‘जय अमरावती’ची घोषणाबाजी
यादरम्यान काही आमदारांनी जय अमरावतीची घोषणाबाजी केल्याचं पहायला मिळालं. अध्यक्षांनी आमदारांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेबाहेर पायऱ्यांवर आंदोलन केलं. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यापूर्वीही त्यांनी तीन राजधान्यांच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला होता. आज आंध्र प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जगातील कोणत्याही देशांमधील राज्यांना तीन राजधान्या नाहीत. आम्ही अमरावती आणि आंध्र प्रदेशला वाचवू इच्छितो, असंही ते म्हणाले होते.

रेड्डी यांचा नायडूंवर निशाणा
विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. नायडू यांना जे हवं होतं तेच केलं असल्याचं ते म्हणाले. विकास केवळ एका स्थानापुरता मर्यादित नसावा, असं शिवरामकृष्ण समितीने सोपवलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यांनी समितीच्या अहवालाची दखल घेतली नसल्याचंही रेड्डी यावेळी म्हणाले.

दोन नव्या राजधान्यांची जोड
आम्ही राज्याची राजधानी बदलत नसून दोन नव्या राजधान्या जोडत असल्याचे रेड्डी म्हणाले. अमरावती पहिल्याप्रमाणेच राहणार आहे. आम्ही कोणत्याही क्षेत्रावर अन्याय करणार नाही. केवळ ग्राफिक्स दाखवून मी नागरिकांची दिशाभूल करणार नाही, असं रेड्डी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh passes three capitals bill cm jaganmohan reddy assembly jud
First published on: 21-01-2020 at 08:29 IST