लोकसभा निवडणुकांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल आणि सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.  या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने काँग्रेस कार्यकारिणीद्वारे घेण्यात आलेली बैठक म्हणजे निव्वळ औपचारिकतेचा भाग असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. लोकसभा निवडणुकांतील पराभव हा पक्षाची सामूहिक जबाबदारी असल्याचे कारण देत काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा राजीनामा स्विकारण्यास नकार दिला. दरम्यान या पराभवाची कारणीमीमांसा करण्यासाठी पक्षाकडून समिती नेमली जाणार आहे. या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार पराभवातून पक्षाला सावरण्यासाठी आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरविण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना देण्यात आले.
या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत काँग्रेस कार्य़कारिणी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारत असल्याचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. काँग्रेस सचिव जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीत झालेल्या वृत्तांताची माहिती पत्रकारपरिषदेत सगळ्यांसमोर ठेवली.
बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी निवडणुकांतील पराभवाला कारणीभूत असणाऱ्या सरकारी पातळीवर त्रुटींची जबाबदारी घेत राजीनामा देणे हा काही पराभवावरील उपाय नसल्याचे सांगितले. सोनिया गांधी यांनीसुद्धा पक्ष आणि सरकारच्या एकूणच कार्य़पद्धतीमध्ये त्रुटी राहिल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मान्य केले. आगामी काळात कमकुवत दुवे असणाऱ्या गोष्टींवर मेहनत घेण्याची गरज सोनियांनी बैठकीत व्यक्त केली. पराभवानंतर टीकेचे केंद्रस्थान बनलेल्या राहुल गांधीनी मनमोहन सिंह यांच्या आतापर्य़तच्या कारभाराची प्रशंसा केली असली तरी काही गोष्टींविषयी जबाबदारी घेण्यात सरकार कमी पडल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने काँग्रेसला संपूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्ष नेतृ्त्वाविरोधात नाराजीची लाट पसरली होती. एकीकडे या बैठकीत काय होते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असतानाच आता राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियांका गांधी यांच्याकडे नेतृत्त्वाची धुरा देण्याची मागणी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी कॉंग्रेसच्या पराभवास माझ्यासह सर्वच जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीच्या बैठकीत टीका होण्याची शक्यता असतानाच पटेल यांच्या वक्तव्यामुळे सामूहिक राजीनाम्याचा विषय पुढे आल्याचे समजते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच काही ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याचा प्रकार समोर आला असतानाच आता उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी करणारे फलक लावण्यात आले आहे. या फलकावर मइया दो आदेश, प्रियंका बढाए कॉंग्रेस का कद, यूपी में अग्नीपथ, आ जाओ प्रियंका, छा जाओ प्रियंका, असा संदेश लिहिण्यात आला आहे. हा फलक उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय झाला आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० पैकी अवघ्या २ जागांवर कॉंग्रेसला विजय मिळवता आला आहे. या दोन्ही जागा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आहेत. उर्वरित सर्व ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला होता.