प्राण वाचवणा-या अग्निशमन दलाच्या जवानांचे नेहमीच आभार मानले जातात..अगदी देवदूताप्रमाणे हे जवान मदतीसाठी तत्परतेने दाखलही होतात. पण गुजरातमध्ये एका बुडणा-या महिलेला वाचवणा-या अग्निशमन दलाच्या जवानांना आभाराचे दोन शब्द सोडा याउलट मनस्तापाचा सामना करावा लागला. बुडताना वाचवलेल्या महिलेच्या पतीने या जवानांशी हुज्जत घातली असून तिला का वाचवले असा जाबच त्याने अग्निशमन दलाला विचारला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादमधील वल्लभ सदन या इमारतीमागील नदीत एका महिलेने उडी मारल्याची माहिती अहमदाबाद अग्निशमन दल आणि आपातकालीन पथकातील जवानांना मिळाली. जवानांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत तत्परतेने या महिलेला वाचवले. महिलेला बाहेर काढल्यानंतर तिच्या पतीला या घटनेची माहिती देण्यात आली. ऐरवी कोणाचे प्राण वाचवल्यावर नातेवाईक अग्निशमन दलाचे भार मानतात. मात्र तिच्या पतीने घटनास्थळी येताच जवानांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तिला का वाचवले असा जाबच त्याने जवानांना विचारला. यावरही न थांबता त्याने जवानांचे छायाचित्र काढले आणि तुम्हाला बघून घेईन अशी धमकीच दिली. या प्रकाराने आपातकालीन पथकातील हे जवानही चक्रावून गेले. घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ अधिका-यांनी शेवटी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी महिला, तिचा पती आणि आपातकालीन पथकातील जवानांचे जबाब नोंदवले. महिलेचा पती हा सीएनजी पंपाचा मालक असून पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घेत होता. यावरुन दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. या दोघांचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन मुलं आहेत. पत्नीलाही पतीवर संशय असून त्याचे एका महिलेशी संबंध असल्याचा संशय तिला होता. पतीसोबतच्या दररोजच्या भांडणाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पती आणि पत्नी दोघांनीही मतभेद मिटवून एकत्र राहू असे सांगितल्यावर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry husband slammed fire brigade personnel for saving his wife
First published on: 28-10-2016 at 12:32 IST