प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात केलेला पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे घेतला आहे. अहमदाबाद येथील न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये आलेल्या राफेल कराराबाबतच्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केला होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल कराराबाबत खोटी आणि अपमान करणारी माहिती छापल्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर सत्र न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाजही सुरु होते. आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरचे खटले मागे घेत आहोत हे सूचित केले आहे अशी माहिती अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी कोर्टात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान मानहानीचा खटला मागे घेण्याबाबतच्या सूचना मिळाल्या असून कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे नॅशनल हेरॉल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी एस चंपानेरी यांनी सांगितले.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरूपम या नेत्यांविरोधात आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काही पत्रकारांचाही यामध्ये समावेश होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल कराराची घोषणा होण्याच्या दहा दिवस आधी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी बनवली या आशयाचा लेख छापण्यात आला होता. मात्र यासंदर्भातला खटला मागे घेण्यात येत आहे अशी माहिती अंबानी यांच्या वकिलांनी कोर्टात दिली.

लोकांची दिशाभूल करणारा लेख नॅशनल हेरॉल्डने छापला आहे असा आरोप करण्यात आला होता. तसेच या लेखामुळे आम्हाला जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून ५ हजार कोटींचा मानहानीचा दावा अंबानी यांच्या कंपनीने दाखल केला होता. मात्र हा खटला अखेर मागे घेण्यात आला आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. आता कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil ambani to withdraw 5000 crore defamation case against congres
First published on: 21-05-2019 at 20:45 IST