Anmol Bishnoi Arrested By NIA: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर अनमोल बिश्नोई याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी अटक केली. सध्या तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर दिल्लीत अटक करण्यात आली. यानंतर एनआयए ने अनमोल बिश्नोईला पटीयाला हाऊस न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची एनआयए कोठीडी सुनावली.

“अनमोल बिश्नोई २०२२ पासून फरार होता. सध्या तुरुंगात असलेला त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई याच्या नेतृत्वाखालील टोळीत सहभागी असल्याबद्दल अटक झालेला तो १९ वा आरोपी आहे. या प्रकरणात तपास केल्यानंतर एनआयएने मार्च २०२३ मध्ये अनमोलवर आरोपपत्र दाखल केले होते. २०१० ते २०२३ या काळात देशात विविध गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी त्याने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना सक्रियपणे मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे”, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली.

प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी अनमोल भारतातील त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया करायचा.

ते म्हणाले की, “अनमोलने टोळीच्या शूटर्सना आणि गुंडांना आश्रय व आर्थिक मदत पुरवायचा, हे तपासात उघड झाले आहे. तो इतर गुंडांच्या मदतीने परदेशातून भारतात खंडणीही वसूल करायचा.”

पंजाबमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या इतर दोघांसह अनमोलला एका चार्टर्ड विमानाने अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले. “अनमोलने आश्रयासाठी अर्ज केला होता, परंतु अमेरिकन न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आणि त्याला हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले”, असे एका सूत्राने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

अनमोलवर देशभरात अनेक खटले प्रलंबित आहेत. असे असले तरी एनआयए अनमोलची मे २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या, गेल्या वर्षी झालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील त्याच्या कथित भूमिकेची सर्वात आधी चौकशी करणार आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या वांद्रे कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी अनमोल हा या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.